सद्गुरू कीर्तनकलाशेखर श्री काणे बुवा, म्हणजेच आदरणीय श्री नानांच्या काव्यरचनांचा आधार घेत त्यातूनच नानांचा जीवनप्रवास उलगडून दाखविण्याचा हा अल्पसा प्रयत्न. एका अर्थाने पाहिले तर गंगेच्या पाण्यात उभे राहून, गंगाजलानेच गंगेला अर्घ्य वाहण्यासारखेच या प्रयत्नाचे आहे. कारण या संकल्पनेला आधार आहे नानांच्या गीतांचा,त्यांच्याशी झालेल्या संवादाचा,त्यांच्या विविध पुस्तकातील लिखाणाचा आणि या संकल्पनेला त्यांनी दिलेल्या आशीर्वादाचा.बरेच दिवस अशा प्रकारे नानांचे जीवन चरित्र त्यांच्याच गीतांचा आधार घेत मांडण्याचा विचार डोक्यात होता.त्याला छानसे नाव देखील सुचले, गीत नानाई. नाना आणि माईंच्या चरणी हे श्रद्धाभिवादन.
- श्री विनय केळकर
बुवांच्या कीर्तनाचे अग्निहोत्र प्रचार आणि प्रसार हे मुख्य उद्दिष्ट होते. २०१७-१८ हे श्रींचे म्हणजेच परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष होते. हे निमित्त साधून किमान १०० ठिकाणी श्रींच्या जन्मकथेचे आख्यान सांगावे व कीर्तनाच्या माध्यमातून अग्निहोत्र सांगावे असा बुवांचा संकल्प होता . या कार्याची सुरुवात श्रींचे जन्मस्थान तसेच गंगा नदी किनारी खरगपूर, कलकत्ता येथे झाली व श्रींनी सुरुवातीचा कालखंड जेथे व्यतीत केला ती राजीम, रायपुर तसेच अमरकंटक हि क्षेत्रे, बिलासपुर, नागपूर, कवठे गुलंद ते अक्कलकोट या बुवांच्या पायी वारीतील अनेक ठिकाणी व भारतभर सर्व प्रमुख पवित्र स्थानांवर बुवांनी संकल्प कीर्तने केली.