याच वर्षी आई-वडिलांना बरोबर घेऊन काशीयात्रा करण्याचे भाग्य नानांना लाभले. याच काशीक्षेत्री काशीच्या विद्वतसभेत नानांचा सन्मान झाला व त्यांना मानपत्र आणि 'कीर्तनाचार्यवर्य' ही पदवी दिली गेली. यात्रेवरून परत येताना नाना अक्कलकोटला गेले. स्वतःच ते मानपत्र श्रींना दाखवणे त्यांना उचित वाटले नाही. तेव्हा त्यांनी सौ. चित्राताई अत्रे यांना सर्व वृत्तांत सांगून ते मानपत्र श्रींच्या चरणी ठेवण्यास सांगितले. चित्राताई श्रींना हा वृत्तांत सांगू लागल्या तेव्हा श्री त्यांना म्हणाले, आम्हाला माहित आहे, काणेबुवांना काशीत मानपत्र मिळाले आहे.आम्हीच ते त्यांना दिले आहे. श्रींच्या या वाक्याचा अर्थ स्पष्ट होता. श्रींनीच सोबत देऊन यात्रा पूर्ण करून घेतली होती. पुढे श्री बराचकाळ या मानपत्राचे कौतुक अनेक जणांजवळ करीत असताना म्हणत,काशीमध्ये मानपत्र मिळणे सोपे नव्हे,पण आमच्या काणेबुवांना ते सहज मिळाले आहे.सर्वसाक्षी श्रींनी वेळोवेळी आमचे काणेबुवा, आमचे काणेबुवा म्हणून उल्लेख करावा,याहून भाग्य नावाची अन्य एखादी वस्तू या पृथ्वीच्या पाठीवर शोधून तरी सापडेल का?
अधिकाधिक सेवा करून श्रींना समाधान कसे देता येईल या शोधात नानांचे मन सदैव असायचे. श्रींना अतिशय प्रिय असणाऱ्या श्रींच्या मातोश्री,सर्वमंगला भगवती सोनामातांचे चरित्र कीर्तनातून आख्यान रूपाने सांगण्याचा नानांचा प्रयत्न होता. श्रींनाही त्यामुळे संतोष झाला होता.एकोणीसशे सत्तर सालच्या गुरुपौर्णिमा उत्सवात श्री एकदा नानांना म्हणाले होते, हे चरित्र असे सुलभ व्हावं की कोणीही वाचले तरी त्याला ते सहजपणे कळेल. त्या सोनामातांचे चरित्र लिहिण्याची प्रेरणा श्रीविद्या जयंतीच्या वेळीच नानांना दिली गेली होती. समोर मोठा प्रकाश दिसला होता.प्रसन्नपणाने नाना उठले,कागद पेन हाती घेतले व त्या कागदावर फक्त श्री गणेशाय नमः एवढेच लिहून झोपी गेले. पण पुढे लवकरच प्रत्येकी शंभर ओव्या असणार, सात अध्यायांचं हे चरित्र लिहून झालं. लेखन चालू असताना नाना जेथे जेथे अडले तेथे त्यांच्या नजरेसमोर ओव्या दिसायच्या. जसजसं लिहून होईल तसं तसं श्रींना वाचून दाखवणे चालू होते. श्री प्रसन्न होते.अशाच एका वाचनाच्या वेळी श्री. नाना अत्रे उपस्थित होते. ते नानांना म्हणाले माझ्या जवळील काही उतारे मी तुम्हाला देतो, या चरित्रासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. त्यावर त्याच क्षणी श्री म्हणाले, काणेबुवांना काहीही दाखवण्याची गरज नाहीये. या कामासाठी आम्ही त्यांना प्रज्ञाचक्षू दिलेले आहेत, त्यायोगे ते काहीही पाहू शकतात.खरोखरीच श्रींनी हे लिखाण नानांकडून करवून घेतले आहे.श्रींनीच या चरित्राचे नाव सुचवले होते,'सप्तशती सोनाई '.
श्रींचे बालपण उपासनी बाबांच्या साकोरी नगरीत त्यांच्या सहवासात गेले होते.त्या पुण्यपावन नगरीत एकोणीसशे बहात्तरसाली पौषमासात श्री जाणार होते.पूर्ण पंचेचाळीस वर्षानंतर श्री पुन्हा तेथे येणार होते. त्यावेळी नानांना श्रींनी बोलावून घेतले होते व तेथील भेटीचा उद्देश सांगितला होता. सोनामाता इथे होत्या हे आज बऱ्याच लोकांना माहीत नाहीये.इथे अधिकारी असणाऱ्या व्यक्तींचा अवमान न होता, सोनामाता सर्वप्रथम इथे होत्या, उपासनीबाबांचं कार्य आणि सोनामाता या भिन्न नव्हत्या, हे सर्वांना कळायला पाहिजे.त्या दृष्टीने कीर्तनाची,विषयाची मांडणी करा असे श्रींनी नानांना सुचविले. कीर्तनाची वेळ जवळ जवळ येत होती तसे नानांच्या मनावरील दडपण वाढत होते. कारण साकोरी येथील तपस्वी व साक्षात दत्त असे श्री,या दोन शक्तींच्या मध्ये उभे राहून त्यांना प्रेमाचा धागा गुंफायचा होता.
कीर्तनाची तयारी झाली. फेटा बांधून झाल्यावर नानांनी श्रींना लवून नमस्कार केला व म्हणाले, जबाबदारी वाटते, सांभाळून घ्या. यावर श्री म्हणाले, तुम्ही फक्त उभे राहा बाकीचे आम्ही सर्व पाहून घेऊ.कोणत्याही सभेत काणेबुवांचा अपमान झाला तर तो आम्हाला सहन होणार नाही. बुवांचा अपमान हा आमचा अपमान आहे. बुवांचे अपयश हे आमचे अपयश आहे.काणेबुवांचे यश हा आमचा गौरव आहे. चला उभे रहा, आम्ही आहोतच, या शब्दांनी नानांच्या मनावरचे ते दडपण हलके झाले. कीर्तनाला सुरुवात झाली. पूर्ण अडीच तास कीर्तन झाले.रंगदेवता प्रसन्नपणे नाचत होती. श्रोते परमावधीचे खुश झाले होते.कीर्तन संपल्यावर बाबुरावजी पारखे यांनी पाठ थोपटून दाद दिली. नानांनी श्रींना दंडवत घातला तेव्हा श्री प्रसन्नपणे हसले.
साकोरीतून अक्कलकोटला परत आल्यावर कुंकुमार्चन करून सोनामातांची एक मूर्ती कुंकवासह आणि सोनामातांचाच एक मोठा फोटो प्रसाद म्हणून श्रींनी नानांना दिला. रामनाम लिहिलेली एक सुवर्णमुद्रिका स्वतः श्रींनी नानांच्या बोटात घातली. हा सोनामातांचा प्रसाद बरं,असं श्री म्हणाले आणि असं म्हणतच नानांच्या अंगावर शाल घातली. त्यानंतर नाना जेव्हा नतमस्तक झाले तेव्हा आपला स्नेहपूर्ण हात त्यांच्या पाठीवरून फिरवीत श्री म्हणाले, कल्याण होईल बरं, आनंद होईल !
अशा अनेक प्रसंगातून श्रींकडून प्रेमाचा वर्षाव होत होता. पहिल्याच भेटीत नानांच्या वडिलांना श्रींनी दिलेले जे आश्वासन,' नारायण हा खऱ्या अर्थाने आमचा मुलगा आहे, त्याची चिंता करू नका', हे शब्द श्री प्रत्यक्ष कृतीमध्ये आणत होते.नाना सुद्धा श्रींच्या सेवेच्या संधीचा लाभ उठवित होते. ध्यानी,मनी, स्वप्नी एकच छंद, एकच ध्यास लागून राहिला होता. श्री, श्री आणि फक्त श्री. मुखात त्यांचेच नाम आणि चित्तात त्यांचेच ध्यान. ती अवस्था वर्णन करणारा नानांचा अभंग.
'नारायणी खाण गुरुमायेची' याची प्रचिती देखील आली होती. नानांना एक अतिशय दिव्य अनुभूती देणारा स्वप्नदृष्टांत झाला होता.
नाना त्यांना पडलेले स्वप्न श्रींना सांगू लागले.श्री आणि नाना पाताळात उभे होते. तिथे एक दैदीप्यमान आणि अतिउंच असा एक स्तंभ होता. त्या स्तंभाला वर्तुळाकार असा एक जिना होता.' श्री' नानांचे बोट धरून जिना चढत होते. अतल, वितल, तलातल, रसातल, महातल आणि पाताळ यातून त्यांनी चालायला सुरुवात केली होती. सप्त पातळ मागे टाकून दोघे पृथ्वीवर आले.दोघे जेव्हा पृथ्वीवर आले तेव्हा श्रींच्या पुण्यपावन पदस्पर्शाने पृथ्वी प्रसन्न झाली होती. पृथ्वीनंतर भूलोक, भुवर्लोक, स्वर्लोक,महर्लोक, जनलोक, तपलोक आणि सत्यलोक. प्रत्येक वेळी श्री त्या त्या लोकाची माहिती सांगत होते. अंतरिक्षामध्ये सत्यलोक हा अखेरचा टप्पा.त्या पलीकडे दूर दूर अनंत उंचीवर, अनंतातच या अनंताचे आसन सिद्ध होते. तिथेच जिना संपला होता.
तेथील दैदीप्यमान अशा सुवर्ण सिंहासनाला कोंदण करून त्यात असंख्य प्रकारची रत्ने जडविली होती. ही रत्ने त्या सिंहासनाची शोभा वाढवीत होती. एक विलक्षण तेजोवलय या आसनाभोवती पसरलेले होते. किंचित निळसर, तांबूस रंगाचे मखमली आसन त्यावर शोभून दिसत होते. माथ्यावर एक भरजरी छत्र होते. श्री त्या सिंहासनावर विराजमान झाले. अनंतकोटी ब्रम्हांडनायक स्वतःच्या आसनावर विराजमान झाला होता. श्रींच्या चरणकमलांची सेवा करीत त्याच आधाराने नाना श्रीचरणांशी बसले होते.
प्रसन्नपणे श्रींनी नानांकडे पाहून निर्देश केला. तो पहा सूर्य, तो पहा चंद्र, तो गुरु, तो ध्रुव, तो शनी, मंगळ, राहू, ते सप्तर्षी, ती पहा आकाशगंगा. श्री निर्देश करून दाखवीत होते, त्यावेळी हे ग्रह अगदी ठिपक्यासारखे दिसत होते. या आसनाभोवती मृग मयूर निर्भयपणे नाचत होते. हंस क्रीडा करीत होते. कोकीळ गात होते. भारद्वाज शकुन सांगत होते. या शकून संकेतांनी नानांना जाग आली व ते स्वप्न तेथेच संपले.
नाना आपल्याला पडलेले हे स्वप्न श्रींना सांगत होते त्यावेळी श्रींचा चेहरा प्रसन्न होता. तुम्हाला काय सांगायचे आहे ते आम्हाला माहित आहे असा भाव त्या प्रेमळ चेहऱ्यावर होता. या स्वप्नांचा अर्थ काय? नानांनी श्रींना विचारले. श्रींचे मुख कमल एकाएकी फुलले. श्री म्हणाले, आपल्याला स्थान दाखविले आहे. याचा अर्थ श्रींनी स्वतःचे स्थान नानांना दाखविले होते व बोट धरून त्यांना तेथे नेले होते.नानांच्या गीतामधून ही अनुभूती शब्दबद्ध झाली आहे.
नयनास तुझ्या ममन नयन भिडले
मीपण माझे तेथ निमाले ||
पाहुनिया समचरण पाऊले
रोम तनुवर झरझर फुलले ||
हात कृपेचा पुढती दिसता
क्षणात माझे भान हरपले ||
नयनातील स्नेहामृत दर्शन
गगन ठेंगणे मला जाहले ||
नारायण गगनावरी गेला
चंद्र सूर्य ही खाली आले ||
आदरणीय नानांचे भाग्यविधाता सद्गुरू - परमसद्गुरू श्री गजानन महाराज, शिवपुरी, अक्कलकोट
बुवांच्या कीर्तनाचे अग्निहोत्र प्रचार आणि प्रसार हे मुख्य उद्दिष्ट होते. २०१७-१८ हे श्रींचे म्हणजेच परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष होते. हे निमित्त साधून किमान १०० ठिकाणी श्रींच्या जन्मकथेचे आख्यान सांगावे व कीर्तनाच्या माध्यमातून अग्निहोत्र सांगावे असा बुवांचा संकल्प होता . या कार्याची सुरुवात श्रींचे जन्मस्थान तसेच गंगा नदी किनारी खरगपूर, कलकत्ता येथे झाली व श्रींनी सुरुवातीचा कालखंड जेथे व्यतीत केला ती राजीम, रायपुर तसेच अमरकंटक हि क्षेत्रे, बिलासपुर, नागपूर, कवठे गुलंद ते अक्कलकोट या बुवांच्या पायी वारीतील अनेक ठिकाणी व भारतभर सर्व प्रमुख पवित्र स्थानांवर बुवांनी संकल्प कीर्तने केली.