असेच एकदा नाना कीर्तनासाठी गुहागरला जायला निघाले होते. मिरज स्थानकावर खूप गर्दी होती. चिपळूणकडे जाणारी पहिली गाडी पूर्ण भरून सुटली होती.नंतरची दुसरी गाडीही पूर्णपणे भरली होती. आता ही गाडी सोडली तर मग मुक्कामावर पोहोचायला उशीर होणार,कीर्तनाची वेळ पाळता येणार नाही, म्हणून नाना त्या गर्दीतच गाडीत चढले. गाडीच्या शेवटच्या पायरीवर उभे राहायला जेमतेम जागा मिळाली होती. मिरज सोडल्यावर लगेचच गाडीचा टायर फुटला व गाडी वेडीवाकडी होत नाना ज्या बाजूला दरवाजात उभे होते त्याच बाजूला पूर्ण पलटी झाली.आजुबाजुची उभी असलेली सर्व माणसं नानांच्या अंगावर कोसळली होती.एकच गोंधळ माजला होता. नानांना मुका मार खूप लागला होता,पण सुदैवाने मोठी दुखापत झाली नव्हती. कसेबसे नाना संकटकाळी बाहेर पडायच्या मार्गातून बाहेर आले, आपल्याला संकटकाळातून बाहेर काढणाऱ्या श्रींना मनोमन वंदन केले आणि तशाच परिस्थितीत कीर्तन चुकवायला नको म्हणून मिळेल त्या गाडीने चिपळूण गाठले व संध्याकाळी गुहागरला पोहोचले. नानांनी तशाही अवस्थेत तो उत्सव साजरा केला. नंतर अक्कलकोटला गेल्यावर श्रींना हा प्रसंग जेव्हा नानांनी सांगितला तेव्हा श्री म्हणाले होते, लक्षात आलं ना हा प्रवास कसा आहे? तरीही अजून बरंच कार्य करून घ्यायचे आहे, म्हणून आपणाला संरक्षण दिले आहे.
पहिल्या भेटीत श्रींनी नानांच्या वडिलांना दिलेले आश्वासन म्हणजे, नारायण हा व्यावहारिक अर्थाने तुमचा मुलगा असेल,पण खऱ्या अर्थाने तो आमचा मुलगा आहे. आम्ही त्याचा हात धरला आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका, हे आश्वासन पुढील काळात श्रींनी शब्दशः पाळले. श्रींना नानांच्या काव्यशक्तीचे मोठे कौतुक होते. ते नेहमी म्हणत, इतर ठिकाणी गीतकार एक असतो, संगीतकार दुसरा असतो, व गायक तिसराच असतो. पण आमच्या काणेबुवांना इतरांची गरज नाही.ते गीत स्वतः तयार करतात, स्वतः चाल लावू शकतात आणि स्वतःच गावु शकतात.
नानांच्या जन्मदिवसाच्याबद्दलही श्रींना कौतुक होते.नानांचा जन्मदिवस व जन्मवेळा आणि पु.विवेकानंदांचा जन्मदिवस व जन्मवेळा एकच आहे.एकदा योगायोगाने नाना त्यांच्या वाढदिवशी अक्कलकोटला असताना यासंबंधीची चर्चा झाली. बोलता बोलता कोणीतरी श्रींना सांगितले की,विवेकानंदांचा जन्म सूर्योदयावेळी झाला आहे.शिवाय विवेकानंद लहानपणी आईच्या हातून पडले होते व त्यांच्या भृकुटीमध्ये जखम झाली होती. त्याची खूण त्यांच्या भृकुटीमध्ये कायमची आठवण म्हणून राहिली होती. हे सर्व योग काणेबुवांना लाभले आहेत. काणेबुवांचा जन्म सूर्योदयाचा, बुवादेखील लहानपणी आईच्या हातून पडले व त्यांच्या भृकुटीमध्ये जखम झाली व ती खूण कायम राहिली आहे. यावर 'श्री' नानांना म्हणाले, विवेकानंदांच्या जन्मदिवशी तुमचा जन्म होतो हा केवळ योगायोग नाही, त्यामागे ईश्वरी योजना असते, संकेत असतो. चार योग तुम्हाला माहित आहेत. आता त्या पुढचे आम्ही सांगतो ते नीट लक्षात घ्या, स्वामींच्या जीवनाला गुरूंचा स्पर्श होता. त्या स्पर्शानेच ते जीवन गतिमान आणि प्रकाशमान झाले. तसा गुरूंचा स्पर्श इथे याही जीवनाला आहे. धर्मप्रचारकाचा पेशा तिथे होता, तसा तो इथेही आहे. तुम्ही जाणतच आहात तरीही आपल्या जन्मदिवशी एक संदेश देऊन ठेवतो आहोत, कुणीतरी मला कीर्तन करायला सांगेल का याची वाट न पाहता आपण संधी घेऊन कीर्तन करायचे, कारण ते आपले कार्य आहे, आपले जीवन आहे. एवढे बोलून 'श्री' एकदम थांबले. त्यांचे दोन्ही हात आशीर्वाद देण्यासाठी वर झाले. श्रींनी जेव्हा स्वतः आपणहून नानांना सांगितले की, विवेकानंदांप्रमाणेच गुरूंचा स्पर्श याही जीवनाला आहे, तेव्हा नानांना झालेला आनंद शब्दात व्यक्त करणे अशक्यच आहे. तो स्पर्श रामकृष्णांचा, तो स्पर्श राम, कृष्ण, बुद्ध, मानवपुत्राचा. तो स्पर्श स्वामी समर्थांचा,तो स्पर्श दत्तात्रेयांचा, तो स्पर्श सर्व शक्तिमान श्रींचा. त्यांच्या कृपेनेच नानांचे सारे जीवन भरले आहे. त्या पूर्णकृपेच्या अनुभूतीचे वर्णन करणारे नानांचे एक गीत आहे. नानांच्या साऱ्या रचनांचा मुकुटमणी ठरू शकेल असे हे गीत आहे.
ती अनुभूती आपणा सर्वांना लाभो या प्रार्थनेसह हे गीत आपण पाहूया.
बुवांच्या कीर्तनाचे अग्निहोत्र प्रचार आणि प्रसार हे मुख्य उद्दिष्ट होते. २०१७-१८ हे श्रींचे म्हणजेच परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष होते. हे निमित्त साधून किमान १०० ठिकाणी श्रींच्या जन्मकथेचे आख्यान सांगावे व कीर्तनाच्या माध्यमातून अग्निहोत्र सांगावे असा बुवांचा संकल्प होता . या कार्याची सुरुवात श्रींचे जन्मस्थान तसेच गंगा नदी किनारी खरगपूर, कलकत्ता येथे झाली व श्रींनी सुरुवातीचा कालखंड जेथे व्यतीत केला ती राजीम, रायपुर तसेच अमरकंटक हि क्षेत्रे, बिलासपुर, नागपूर, कवठे गुलंद ते अक्कलकोट या बुवांच्या पायी वारीतील अनेक ठिकाणी व भारतभर सर्व प्रमुख पवित्र स्थानांवर बुवांनी संकल्प कीर्तने केली.