narayanbuwa kane


गीत नानाई

पृष्ठ 10

श्रींच्या महानिर्वाणानंतरची काही वर्षे बेचैनीत निघून गेली होती.नानांची कीर्तने, पदयात्रा नेहमीप्रमाणेच चालू होती.पण कुठच्याही गोष्टीत रसच वाटत नव्हता. जीवनाचा उद्देश हरवल्यासारखी नानांची अवस्था झाली होती. मन सारखे श्रींच्या आठवणीने भरून यायचे.आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाल्यासारखे सदैव वाटत होते. आणि म्हणूनच की काय आपल्या सतशिष्याच्या आयुष्यातील ही पोकळी श्रींनीच जणू भरून काढली. सज्जनगडावरून समर्थांची भिक्षाफेरी निघणार होती. या फेरीमध्ये नानांची कीर्तने व्हावीत असे पूज्य मोहनबुवा रामदासी यांना वाटत होते. नानासुद्धा ही श्रींचीच इच्छा मानून समर्थांच्या भिक्षाफेरीत सामील झाले.समर्थ रामदासांचे गोत्र जामदग्न्य तसेच श्रींचे गोत्र देखील जामदग्न्यच आहे.या संकेतानी जणू श्रींनीच आपले कृपाछत्र नानांवर धरले होते. नानांनी सलग नऊ वर्षे येथे सेवा केली. या भिक्षाफेरीतून अग्निहोत्र प्रचारही खूप करता आला.शिणलेल्या मनाला उभारी मिळाली. याच दरम्यान अशोकजी सिंघल, साध्वी ऋतंबरा,तेव्हाच्या लोकसभा अध्यक्ष माननीय सुमित्राजी महाजन यांच्याशी त्यांचा परिचय झाला. सुमित्राजी महाजन यांच्या ओळखीने त्यावेळचे आपले पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या भेटीचा योग देखील नानांना आला. देशाच्या सर्वोच्च सत्ताधाऱ्याला भेटायला जाताना नानांवर दडपण आले असेल का? मुळीच नाही! नाना स्वतःसाठी काही मागायला थोडेच जात होते. अटलजींच्या भेटीत नानांनी अटलजींना अग्निहोत्राबद्दल सांगितले. देशाचा राज्यकर्ता अग्निहोत्री असावा ही तळमळ त्यामागे होती.

समर्थांच्या भिक्षाफेरीत नाना वर्षाचे दोन अडीच महिने असे नऊ वर्षे जात होते.या सेवेचे दिव्य असे फळ नानांना मिळाले. समर्थांच्या जीवनावरील काव्य 'गीत समर्थायन' नानांकडून निर्माण झाले.समर्थभक्त श्री. सुनीलजी चिंचोलकर यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन देखील झाले. या कार्यक्रमात सुनीलजी चिंचोलकरांनी नानांचा आधुनिक ग.दि.माडगुळकर असा गौरव केला. या काव्यातले पहिले पद आपण पाहूया.

या समर्थ चरित्राच्या गायनाचे देखील खूप ठिकाणी कार्यक्रम झाले. पहिला कार्यक्रम नेवऱ्याला दासनवमीच्या दिवशी आमच्या घरी झाला.चाळीस गाण्यांचा हा कार्यक्रम तीन दिवसांमध्ये, संध्याकाळी पाच ते आठ या वेळात केला होता. या कार्यक्रमातील स्त्री आवाजातील गीते सौभाग्यवती माई सादर करीत असत. या निमित्ताने पाच-सहा दिवस नाना माई घरी राहिले होते.नंतर महाड, गणपतीपुळे, मालगुंड, सांगोला, चिंचवड अशा अनेक ठिकाणी हे कार्यक्रम झाले. महाडच्या वीरेश्वर महाराजांच्या मंदिरातील कार्यक्रम लक्षात राहण्यासारखा झाला. कार्यक्रमाचे पहिले दोन दिवस चांगले पार पडले. दुसऱ्या दिवशीपासूनच महाडमध्ये पावसाचा जोर वाढला होता. कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी तर दुपारपासूनच महाडमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली होती. अशा परिस्थितीत त्या अंतिम दिवसाचा कार्यक्रम कसा करायचा हा प्रश्न निर्माण झाला होता. पाणी भरायला लागले आहे म्हणजे श्रोते कार्यक्रमाला येणार नाहीत हे निश्चित होते. पण नाना अविचल होते. ते म्हणाले, श्रोते नसले तरी वीरेश्वर महाराजांसाठी आपण कार्यक्रम करू. ते पहिल्या दिवसापासूनच उपस्थित आहेत. आम्ही गुडघाभर पाण्यातून चालत मंदिरात पोहोचलो. पावसामुळे साथीदार आले नव्हते. टाळ वाजवणारे एक जण होते ते तेवढे फोन केल्यावर आले.त्यांना थोडाफार तबला येत होता. नानांनी स्वतः हार्मोनियम वाजवीत कार्यक्रमाला सुरुवात केली. त्या दिवशी पावसामुळे स्थानिक निवेदक येऊ शकला नव्हता. त्यामुळे त्या दिवसापासून या कार्यक्रमाला एक नवीन निवेदक कायमचा लाभला, श्री. विनय मुकुंद केळकर.माझी निवेदक म्हणून अशी ही अगदी अनपेक्षितपणे सुरुवात झाली. बाजूने वाहते पाणी, कोसळणारा पाऊस,वीजांचा कडकडाट आणि समोर वीरेश्वर महाराज. व्यासपीठावर नाना, माई,तबलजी आणि निवेदक म्हणून मी. समोर श्रोते म्हणून या कार्यक्रमाचे आयोजक असलेले हरवंदे कुटुंबीय. सगळे मिळून आम्ही आठ जण आणि वीरेश्वर महाराज.तो कार्यक्रम मी कधीच विसरू शकत नाही. समोर श्रोते नसले म्हणून काय, आम्ही तर आहोत ना? ही श्रींची आज्ञा नानांनी किती खोलवर जपली आहे याचा वस्तूपाठ त्यादिवशी मी घेतला.

गीत समर्थांचा हाच कार्यक्रम पूज्य संभाजीराव भिडे गुरुजींच्या आग्रहास्तव सांगलीत देखील करण्याचा योग आला. व्यासपीठावर नाना आणि समोर आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी. गुरुजी प्रत्येक पद एकाग्रतेने ऐकत होते. मध्येच मान डोलावून दाद देखील देत होते. पूर्णपणे रंगून जाऊन तीन दिवस ते हा कार्यक्रम ऐकत होते.कार्यक्रम सादर करणारे नाना आणि तो कार्यक्रम पूर्णपणे रंगून जाऊन ऐकणारे संभाजीराव भिडे गुरुजी. त्या दोन ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांना बघणं हाच माझ्यासाठी मोठा योग होता. सांगलीच्या सिटी हायस्कूलचा हॉल श्रोत्यांनी खचाखच भरलेला असायचा.कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी भिडे गुरुजींनी नानांचा सत्कार केला. त्यावेळी ते म्हणाले की आपला हा उज्वल इतिहास सांगणारा कार्यक्रम गावोगावी व्हावा ही माझी इच्छा आहे.

दोनहजार सालच्या दरम्यान नाना माईंना घेऊन चारधाम कैलास मानसरोवर यात्रा करून आले. दरवर्षीची पदयात्रा नेहमीच्या उत्साहात पार पडत होती. नवनवीन माणसे या पदयात्रेच्या माध्यमातून श्रीकार्याशी जोडली जात होती. पूज्य श्रीकांतजी महाराज या पदयात्रेला कार्यकर्ते तयार करणारी कार्यशाळा म्हणायचे. अशातच पदयात्रेचे बत्तीसावे वर्ष आले. दोनहजारपाच सालची म्हणजे बत्तीसाव्या पदयात्रेच्या वेळेची ही गोष्ट आहे. दुसऱ्याच दिवशी पदयात्रा निघायची होती. नाना त्या गडबडीतच होते. सगळी तयारी करणे चालू होते. पालखीची ढकलगाडी तयार करून झाली होती. सगळी तयारी करण्यात संध्याकाळ झाली. संध्याकाळी नानांना उलटी झाली. त्यातून थोडेसे रक्त पडले, पण नाना त्याकडे दुर्लक्ष करून पदयात्रेच्या तयारीत व्यग्र होते. रात्री आराम पडावा म्हणून नाना गरम पाणी पिऊन झोपी गेले. पहाटे तीनच्या दरम्यान नानांच्या पोटातून प्राणांतिक वेदना चालू झाल्या. नानांनी भार्गवदादाला हाक मारून उठवले. तो डॉक्टरना घेऊन आला.डॉक्टरनी तपासल्यावर सांगितले की परिस्थिती गंभीर आहे, मिरजेला जावे लागेल. बहुतकरून अपेंडिक्स फुटले आहे असे वाटते. भार्गवदादा जीप शोधायला गेला. त्या आडगावात जीप मिळायला सकाळचे साडेनऊ वाजले. खराब रस्त्यामुळे धक्के बसू नयेत म्हणून हळूहळू जात मिरजेला पोहोचायला सकाळचे साडेअकरा वाजले. मिरजेला डॉक्टर दिवेकर यांनी नानांना तपासले,व नानांचे धाकटे भाऊ वसंतरावांना सांगितले की हाताबाहेर गेलेली केस आहे, पण आपण प्रयत्न करूया. सगळ्या तपासण्या पूर्ण व्हायला दुपारचे तीन वाजले. अपेंडिक्स फुटल्याचे निदान निश्चित झाले होते.तातडीने ऑपरेशन करणे गरजेचे होते. ऑपरेशनसाठी सांगलीहून डॉक्टर आपटे यायचे होते. काम आटोपून यायला त्यांना सायंकाळचे सात वाजले. अपेंडिक्स फुटून आता जवळजवळ सतरा तास झाले होते. मेडिकल सायन्स सांगते की अपेंडिक्स फुटल्यावर माणूस जास्तीतजास्त चार-पाच तास जिवंत राहू शकतो. सायंकाळी सात नंतर नानांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेतले गेले. अडीचतास ऑपरेशन चालले. पोटाला वितभर टाके पडले. नाना म्हणतात ऑपरेशननंतर मी नळीबहाद्दर झालो होतो.सर्व देहाला वेगवेगळ्या नळ्या लावल्या होत्या. इन्फेक्शन खूपच होते त्यामुळे रोज वेगवेगळ्या टेस्ट चालू होत्या. त्या काळात माई धीराने नानांची सेवा करीत होत्या. पदयात्रेत खंड पडू नये म्हणून भार्गवदादा मन घट्ट करून पादुका घेऊन पदयात्रेला निघाला होता. हेमाताई, गीताताई,संध्याताई सर्व हवं नको ते पाहत होत्या. स्नेहा ताई मोठ्या धीराने घर सांभाळीत होती.पाच दिवसानंतर डॉक्टरनी सांगितले, इन्फेक्शन जबरदस्त होते, खरंतर आम्ही अशी केस हाती घेत नाही, मिशन हॉस्पिटलला पाठवतो, कारण पेशंट जाणार हे निश्चितच असते,उगाच आपल्याला अपयश घ्यायला नको. पण हा घरचा माणूस आहे, त्याचे हाल नकोत म्हणून मी केस हाती घेतली, गजाननाची कृपा, माझ्या हाताला यश आले. खरोखरीच एका जीवघेण्या प्रसंगातून श्रींनी नानांना तारून नेले होते.त्या ऑपरेशननंतर तिसऱ्या दिवशी नानांच्या डोक्यात तशाही परिस्थितीत एक गीत तयार झाले. त्यांनी डॉक्टरना ते गीत ऐकवले तेव्हा डॉक्टरनी नानांना हात जोडून नमस्कार केला.ते गीत आपण पाहूया.

मी नित्यमुक्त आहे
मायेचा बद्ध आहे
संसार वादळाची
अनुभूती घेत आहे ||धृ||

गर्भात व्यक्त झालो
मायेत बद्ध झालो
हे देहरूप धरुनी
जगी या प्रविष्ट झालो
उपनाम नाम सारे
माया प्रबंध आहे ||१||

नाती इथे मिळाली
मती गुंग ती जहाली
प्रीती शरीरी जडली
बुद्धी भ्रमीष्ट झाली
एका क्षणात कळले
हे नाशिवंत आहे ||२||

केव्हा जगात येणे
केव्हा इथून जाणे
हे तोचि सर्व जाणे
तो दाखवील ठाणे
पदी त्याच नम्र होणे
हा इष्ट मार्ग आहे ||३||

या जीवघेण्या दुखण्यानंतर जेमतेम महिनाभराच्या विश्रांतीने नाना परत श्रीकार्यासाठी बाहेर पडले. कीर्तनांचे दौरे परत नेहमीसारखे चालू झाले. एवढ्या मोठ्या ऑपरेशननंतर गातांना त्यांना काहीही त्रास झाला नाही, हि खरोखरी त्यांच्यावरची ईश्वरी कृपाच होती. देहाचे भोग कधी श्रींच्या कार्याआड येऊ द्यायचे नाहीत हि नानांची पहिल्यापासूनच मनोभूमिका होती, आणि त्यानुसारच ते परत श्रींच्या कार्याला लागले.

कार्यक्रम

परमसद्गुरू श्री गजानन महाराज जन्मशताब्दी वर्ष (१७ मे २०१७-१८)
श्री महाराज जन्मकथा संकल्प भारत दौरा

बुवांच्या कीर्तनाचे अग्निहोत्र प्रचार आणि प्रसार हे मुख्य उद्दिष्ट होते. २०१७-१८ हे श्रींचे म्हणजेच परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष होते. हे निमित्त साधून किमान १०० ठिकाणी श्रींच्या जन्मकथेचे आख्यान सांगावे व कीर्तनाच्या माध्यमातून अग्निहोत्र सांगावे असा बुवांचा संकल्प होता . या कार्याची सुरुवात श्रींचे जन्मस्थान तसेच गंगा नदी किनारी खरगपूर, कलकत्ता येथे झाली व श्रींनी सुरुवातीचा कालखंड जेथे व्यतीत केला ती राजीम, रायपुर तसेच अमरकंटक हि क्षेत्रे, बिलासपुर, नागपूर, कवठे गुलंद ते अक्कलकोट या बुवांच्या पायी वारीतील अनेक ठिकाणी व भारतभर सर्व प्रमुख पवित्र स्थानांवर बुवांनी संकल्प कीर्तने केली.

संकल्प दौरा कीर्तने

  • क्र. ११४- श्री. महालक्ष्मी मंदीर, कल्याण
  • क्र. ११३- ज्येष्ठ नागरिक संघ, डोंबिवली
  • क्र. ११२- औरंगाबाद
  • क्र. १११- कोंडे, राजापूर
  • क्र. ११०- श्री. आपटे, गोवा
  • क्र. १०९- कराड
  • क्र. १०८- गजानन महाराज मंदिर, उज्जैन
  • क्र. १०७- श्री. रामनवमी उत्सव, आपटा
  • क्र. १०६- श्री. कुलकर्णी, पनवेल
  • क्र. १०५- गणपती मंदिर, डोंबिवली
  • क्र. १०४- हनुमान मंदीर, बदलापूर
  • क्र. १०३- वांगणी, बदलापूर
  • क्र. १०२- बदलापूर, श्री कुवळेकर
  • क्र. १०१- सोलगाव, राजापूर, रत्नागिरी
  • क्र. १००- विश्व अग्निहोत्र दिन समारोह, रत्नागिरी
  • क्र. ९९- श्री. घरत, गणेशपुरी
  • क्र. ९८- श्री. पटवर्धन, कल्याण
  • क्र. ९७- श्री. कौपिनेश्वर देवस्थान, ठाणे
  • क्र. ९६- श्री. गजानन महाराज मंदिर, डहाणू
  • क्र. ९५- वाकवली
  • क्र. ९४- शिवथरघळ
  • क्र. ९३- श्रीवर्धन
  • क्र. ९२- श्री. हरवंदे, महाड
  • क्र. ९१- तळा
  • क्र. ९०- गाणगापूर
  • क्र. ८९- सोनामाता विद्यालय, सोलापूर
  • क्र. ८८- हनुमान मंदिर, श्री. केळकर, नागपूर
  • क्र. ८७- रथसप्तमी उत्सव, श्री. कठाळे, नागपूर
  • क्र. ८६- श्री. काळकर, मुलुंड, मुंबई
  • क्र. ८५- मोरजी, गोवा
  • क्र. ८४- ब्रह्मदेव देवस्थान, ब्रह्माकरमळी, सत्तरी, गोवा
  • क्र. ८३- साखळी, गोवा
  • क्र. ८२- श्री योगेश्वरी देवी संस्थान, म्हापसा, गोवा
  • क्र. ८१- अग्नीहोत्र मंदिर, श्री. आपटे, म्हापसा, गोवा
  • क्र. ८०- शृंगेरी
  • क्र. ७९- दत्तमंदिर, ठाणे
  • क्र. ७८- बालाजी मंदिर, कल्याण
  • क्र. ७७- दत्तजयंती उत्सव, कवठेगुलंद
  • क्र. ७६- उपासनी बाबा आश्रम, साकोरी
  • क्र. ७५- श्री. साईबाबा देवस्थान, शिर्डी
  • क्र. ७४- श्री. मोरया गोसावी देवस्थान उत्सव, चिंचवड
  • क्र. ७३- गणेशवाडी
  • क्र. ७२- श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव, पुणे
  • क्र. ७१- कुरुक्षेत्र
  • क्र. ७०- मथुरा
  • क्र. ६९- महाराष्ट्र भवन दिल्ली
  • क्र. ६८- हृषिकेश (संगम)
  • क्र. ६७- हरिद्वार
  • क्र. ६६- गया
  • क्र. ६५- बुद्धगया
  • क्र. ६४- प्रयाग (त्रिवेणी संगम)
  • क्र. ६३- काशी
  • क्र. ६२- अयोध्या
  • क्र. ६१- सोनामाता मंदिर, सिद्धपुर (मातृगया), गुजरात
  • क्र. ६०- साईमंदिर, भद्रा, अहमदाबाद
  • क्र. ५९- दत्तमंदिर, चांदखेडा, अहमदाबाद
  • क्र. ५८- श्री गिरनार पर्वत पायथा, जुनागड
  • क्र. ५७- प्रभास तीर्थ क्षेत्र, गुजरात
  • क्र. ५६- सोमनाथ मंदीर, गुजरात
  • क्र. ५५- द्वारका, गुजरात
  • क्र. ५४- बेट द्वारका, गुजरात
  • क्र. ५३- नारेश्वर, गुजरात
  • क्र. ५२- गरुडेश्वर, गुजरात
  • क्र. ५१- दहेज, गुजरात
  • क्र. ५०- बडोदा
  • क्र. ४९- श्री परशुराम मंदिर, संगम माहुली, सातारा
  • क्र. ४८- लईराई देवीसंस्थान, शिरगाव, गोवा
  • क्र. ४७- दत्तमंदिर, भोर, महाराष्ट्र
  • क्र. ४६- ब्रह्मानंद स्वामी मठ, कागवाड, महाराष्ट्र
  • क्र. ४५- कवठेगुलंद, कन्यागत महापर्वकाळ समाप्ती उत्सव
  • क्र. ४४- विठ्ठल मंदिर, गणेशवाडी
  • क्र. ४३- चिकुरडे, सांगली
  • क्र. ४२- रावेर, जामखंडी, बेळगाव
  • क्र. ४१- ढोल्या गणपती मंदिर, वाई
  • क्र. ४० कागवाड
  • क्र. ३९ मिरज किल्ला भाग
  • क्र. ३८ दड्डी
  • क्र. ३७ वरणगे पाडळी
  • क्र. ३६ पट्टणकोडोली
  • क्र. ३५ चिपळूण
  • क्र. ३४ श्री क्षेत्र परशुराम
  • क्र. ३३ गणपतीपुळे
  • क्र. ३२ संगमेश्वर
  • क्र. ३१ देवरुख
  • क्र. ३० साखरपा
  • क्र. २९ रत्नागिरी
  • क्र. २८ श्री परशुराम मंदिर, बाणगंगा, वाळकेश्वर, मुंबई
  • क्र. २७ सौरभ कार्यालय बावधन पुणे
  • क्र. २६ श्री राममहाराज भक्तमंडळी, रंकाळा संध्यामठ कोल्हापूर
  • क्र. २५ गुरुमंदिर, अक्कलकोट
  • क्र. २४ सोलापूर
  • क्र. २३ वाघोली
  • क्र. २२ मंगळवेढा
  • क्र. २१ पंढरपूर
  • क्र. २० खर्डी
  • क्र. १९ सांगोला
  • क्र. १८ कुची
  • क्र. १७ मिरज
  • क्र. १६ सांगली
  • क्र. १५ बालाजी मंदिर नागपूर
  • क्र. १४ गजानन महाराज मंदिर, महाल, नागपूर
  • क्र. १३ नागपूर
  • क्र. १२ मुर्तीजापूर (बाळप्पा मठ)
  • क्र. ११ कारंजा (दत्त जन्मस्थान)
  • क्र. १० अमरावती
  • क्र. ९ काटोल (चंडिका मंदिर)
  • क्र. ८ नागपूर (मानेगाव दत्तमंदिर)
  • क्र. ७ अमरकंटक
  • क्र. ६ रायपूर
  • क्र. ५ राजीम (राजीव लोचन मंदिर)
  • क्र. ४ बिलासपूर गजानन महाराज मंदिर
  • क्र. ३ बेल्लूर मठ कलकत्ता
  • क्र. २ दक्षिणेश्वर मठ कलकत्ता
  • क्र. १ खरगपूर (श्रींचे जन्मस्थान)