अशीच एक ईश्वरी योजना घडून यायची होती. पादुका देतांना 'श्री' नानांना म्हणाले होते, पादुकांसाठी स्थान आम्ही निश्चित केले आहे. हे स्थान कोठे असेल याचा नाना शोध घेत होते. पादुकांची महती आता वाढत होती. दूरदुरून माणसे पादुकांच्या दर्शनासाठी येत होती. तथापि पादुकास्थान सध्या मात्र कुरुंदवाडच्या बिऱ्हाडीच होते. कुरुंदवाड, शिरोळ, नृसिंहवाडी, जयसिंगपूर, इचलकरंजी,गणेशवाडी अशा अनेक ठिकाणी नानांनी जागांचा शोध घेतला, पण कोठेही जागा मिळाली नाही.अशीच एक जागा पाहायला नाना गणेशवाडीला गेले होते. परतीच्या मार्गात कवठे गुलंद गावच्या माळावर त्यांचा एक शाळकरी मित्र श्री.रायगोंडा पाटील यांची भेट झाली. नानांनी त्यांना जागेसंबंधीची आपली व्यथा सांगितली. या गृहस्थांनी कवठे गुलंद या गावी ही बातमी पसरवली. या गावचे एक सदृहस्थ, एक सामाजिक कार्यकर्ते श्री.मधुकर रामचंद्र जगताप यांच्या कानावर ही वार्ता गेली.त्यांच्या पत्नी सौ. अंजनाबाई या रेडिओवरून होणारी नानांची कीर्तने नेहमी ऐकायच्या. अशा या कीर्तनप्रेमी सात्विक दंपतीने आपापसात सल्लामसलत केली व दोघांनीही निर्णय घेतला,माळ भागात सात गुंठ्यांचा आपला जो प्लाॅट आहे तो आपण नानांना देऊया. श्री. जगताप आपणहून कुरुंदवाडला आले. नानांना भेटले व त्यांनी बक्षीसपत्र करून तो प्लॉट नानांच्या स्वाधीन केला.
ईश्वरी योजना कशी असते पहा. जगतापांनी हा प्लॉट एकोणीसशे शहात्तर मध्येच खरेदी केला होता. आणि सत्यात्तरसाली 'श्री' म्हणाले होते पादुकांसाठी जागा आहे. 'तेरी योजना तुही जाने, अजब तेरा व्यापार,स्वामी तू कितना अपरंपार ',असे माधवरावजी पोतदार म्हणत ते काही खोटे नाही. श्रींनी योजलेल्या याच जागेत श्रीदत्त मंदिर, अग्नि मंदिर आणि स्वतःसाठी निवासस्थान याचे बांधकाम चालू झाले. नाना कीर्तनांच्या निमित्ताने बरेचसे घराबाहेरच असत. त्यामुळे या बांधकामावर देखरेख करण्याचे कठीण काम भार्गवदादाने अतिशय मेहनतीने केले,आणि श्रींचे पादुका स्थान निर्माण झाले. मंदिरातील दत्तमूर्ती कशी असावी असा विचार चालू असताना भार्गवदादा म्हणाला, चिमण्याबुवांना प्रसाद म्हणून मिळालेली दत्तमूर्ती आहे तशीच मूर्ती आपण करून घ्यावी. हा विचार नानांनी श्रींना सांगितला तेव्हा श्रींना सुद्धा हा विचार खूप आवडला. ते म्हणाले, फारच सुंदर,आमचीही तीच इच्छा आहे. भार्गवरामांच्या मुखातून आम्हीच बोललो आहोत असं समजा. त्याच ध्यानाची मूर्ती करून घ्या, आम्हाला त्यात निश्चितच आनंद वाटेल. श्री एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी नानांना सांगितले, तुम्ही मुंबईला जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे सध्याचे डीन, श्री. एन. पी. खानविलकर साहेबांना भेटा, त्यांनी मनावर घेतले तर काम चांगलेच होईल.
नाना ताबडतोब मुंबईला आले. खानविलकरसाहेबांना भेटले. खानविलकरसाहेब नानांना ओळखतच होते.नानांनी त्यांना येण्याचे प्रयोजन सांगितले. श्रींनी मला तुमची भेट घ्यायला सांगितली आहे, मला एक दत्तमूर्ती करावयाची आहे.नानांचे बोलणे ऐकून खानविलकर पती-पत्नीचे डोळे पाणावले. खानविलकरसाहेबांच्या तर डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. ते पटकन खुर्चीमध्ये बसले. नानांना कळेचना काय झाले. थोड्यावेळाने भावावेग ओसरल्यावर साहेबांच्या पत्नी कापऱ्या आवाजात नानांना म्हणाल्या, त्यांना कोणीतरी अधिकारी साधुपुरुष भेटला होता. तो त्यांना म्हणाला होता, तुमचे यजमान मूर्तिकार आहेत त्यांना एक दत्तमूर्ती करायला लागणार आहे. त्यावर बाईंनी म्हटले होते,आमचे यजमान कोणत्याही देवतेची मूर्ती करायला शिकवतात, पण स्वतः गणेशभक्त असल्यामुळे काम घ्यायचे तर फक्त गणेशमूर्तीचेच हा त्यांचा संकल्प आहे, त्यामुळे ते हे काम करणार नाहीत. त्यावर तो गृहस्थ म्हणाला, ते काहीही असो त्यांना दत्तमूर्ती करायलाच लागणार आहे आणि त्या मूर्तीसाठी मंदिर उभे राहणार आहे. त्या दिवसापासून गेले तीन महिने आम्ही या गोष्टीवर विचार करीत आहोत की हा काय प्रकार आहे. आज तुम्ही नेमके अक्कलकोटहून श्रींच्या कडून आलात. श्रींचे सेवक आहात आणि तुम्हालाच मूर्ती हवी आहे हा योग आगळा आहे. मी इतर कोणतीही मूर्ती करीत नाही हे खरे आहे,तरी पण एकंदर हा योग पाहता ही दत्तमूर्ती माझेच कडून व्हावी ही श्रींची इच्छा दिसते,म्हणून मी हे काम स्वीकारत आहे. नानांना अतिशय आनंद झाला. त्यांनी घरच्या दत्तमूर्तीचे विविध फोटो साहेबांच्या स्वाधीन केले. याच ध्यानाची श्रीपाद श्रीवल्लभ भगवान दत्तात्रेयांची साधारण दोन फूट उंचीची मूर्ती हवी आहे हे सांगून खर्चाचा अंदाज मागितला. त्यावर साहेब म्हणाले खर्चाचा अंदाज मॉडेल तयार झाल्यावरच देता येईल. तरी एक सांगतो की श्रींच्या इच्छेनेच ही मूर्ती घडणार आहे.त्यामुळे माझ्या वैयक्तिक परिश्रमांचे मी काहीही घेणार नाही, फक्त नोकरांची मजुरी व धातूची किंमत तेवढीच आपण द्या. मॉडेल तयार झाल्यावर कळवायचे ठरले व नाना श्रींना भेटायला अक्कलकोटला निघाले.
नानांनी सर्व वृत्तांत श्रींचे कानावर घातला. श्री म्हणाले, काही हरकत नाही, काम चांगलेच होईल. ही घटना आहे डिसेंबर एकोणीसशेशहाऐंशी मधील आणि बरोबर दीड महिन्यांनी मॉडेल तयार असल्याचे खानविलकर साहेबांचे पत्र नानांच्या हाती पडले. पण नाना त्यावेळी एका वेगळ्याच विवंचनेत होते.कारण घराचं,मंदिराचं चालू असलेले बांधकाम बजेटच्या बाहेर चालले होते. हाती असलेला सर्व पैसा पाया घालण्यातच संपला होता. शक्ती अपुरी पडत होती. हाती पत्र पडलं त्यावेळी नानांना जवळजवळ पंचवीस हजाराचे कर्ज झाले होते. अशातच मॉडेल पाहायला मुंबईत जायचे म्हणजे किमान दोनशे रुपये तरी हाती हवेत. कशीबशी पैशांची जोडणी करून नाना मुंबईला पोहोचले. मूर्तीचे मॉडेल अप्रतिम झाले होते. नानांनी मूर्तीचे मॉडेल पाहिले, त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू येऊ लागले.कितीतरी वेळ ते मूर्तीकडे पाहतच होते. त्यांनी खानविलकरसाहेबांना कडकडून मिठी मारली.त्यांच्या कलेचे कौतुक केले. नानांनी मूर्तीच्या रकमेबद्दल विचारले तेव्हा खानविलकरसाहेब म्हणाले, मी माझ्या शब्दावर कायम आहे. माझा मेहनताना मी घेणार नाही.मजुरी व धातूची किंमत तेवढी तुम्ही द्या.ती साधारण आठ हजार रुपये येणार आहे, तेवढेच आपण मला द्या म्हणजे झाले. जिथे मुंबईला येण्यासाठीच्या पैशांची जुळणी कठीण झाली होती तिथे हे मूर्तीचे आठ हजार आता कुठून देणार या विचारात नाना पडले. पण घरी जाऊन पैसे पाठवून देतो असे सांगून ते घरी परत आले. आता काय करावे या विचारात विमनस्कपणे ते बांधकामाजवळ बसले होते.एवढ्यात एक तरुण गृहस्थ स्कूटरवरून नानांची चौकशी करीत आला.त्याला इचलकरंजीच्या श्री. बाळासाहेब फडके यांनी पाठवले होते. मंदिराच्या सुशोभीकरणाच्या कामाचा अंदाज घेण्यासाठी त्यांनी त्याला पाठविले होते. तो खर्च ते स्वतः सेवा म्हणून करणार होते. नाना दुसऱ्या दिवशी स्वतः बाळासाहेबांना भेटले.त्यांचा विचार जाणून घेतला, व सेवा म्हणून सुशोभीकरणाऐवजी मूर्तीसाठीची सेवा देण्यासाठी सुचविले. फडकेंनी त्याक्षणी नानांकडून खानविलकरसाहेबांचा पत्ता लिहून घेतला व त्याच रात्री ते मुंबईला रवाना झाले. खानविलकर साहेबांना भेटून त्यांनी मूर्तीचे आठ हजार रुपये त्यांना पोहोच केले व तशी पावती त्यांनी नानांना आणून दिली. नानांचे डोळे श्रींच्या कृपेने पाणावले. एक मोठा कलाकार दत्तमूर्ती घडवितो, दीड महिन्यात मूर्तीचे मॉडेल तयार होते, गाठीशी एक पैसाही नसताना मूर्तीसाठीच्या आठ हजार रुपयांची पावती घरपोच होते, याला ईश्वरी चमत्कार याशिवाय वेगळे काय म्हणणार? मूर्ती तयार होईल तेव्हा आधी शिवपुरीत मूर्ती घेऊन या असा श्रींचा आदेश होता. त्यानुसार मूर्ती तयार झाल्यावर मूर्ती घेऊन नाना अक्कलकोटला जायला रेल्वे स्टेशनवर आले. प्रचंड गर्दीमुळे रिझर्वेशन मिळेना. एवढ्या गर्दीतून ही साधारण तीस किलो वजनाची मूर्ती,तिचे पावित्र्य जपत अक्कलकोटपर्यंत कशी न्यायची या विवंचनेत नाना प्लॅटफॉर्मवर उभे होते. एवढ्यात एक गृहस्थ त्यांच्याजवळ आले आणि नानांना म्हणाले, तुम्हाला कुठे जायचे आहे? नाना म्हणाले, अक्कलकोटला. तेव्हा त्या गृहस्थानी तिकीट काढले का विचारले. नाना म्हणाले,तिकीट मिळाले नाहीये. त्यावर ते गृहस्थ म्हणाले माझ्याकडे अक्कलकोटचे फर्स्ट क्लासचे तिकीट आहे, तुम्हाला चालेल का? नानांनी पाणावलेल्या डोळ्यांनी ते तिकीट घेतले. नानांना आभार मानण्याचीसुद्धा संधी न देता ते गृहस्थ एकाएकी नाहीसे झाले. ही मूर्ती तयार होताना आणि घरी येतानाचा प्रत्येक घटनाक्रम तर्कापलीकडची अनुभूती देतो.
मूर्तीसह नाना अक्कलकोटला पोहोचले. स्वतः श्रींनी मूर्तीला औक्षण करून अभिवादन केले. शिवमंदिरात सोमेश्वरलिंगाच्या बरोबर समोर ही मूर्ती पूर्ण एकवीस दिवस निवासाला होती. नित्य नियमाने 'श्री' स्वतः तिची पूजा करीत होते. जणू त्या मूर्तीमध्ये शक्तीस्थापना करीत होते. एकवीस दिवसानंतर गणेशवाडी गावचे एक व्यापारी श्री. गजाननराव डफळापुरे यांनी नवीन घेतलेल्या जीपमधून ही मूर्ती गणेश वाडीला आली. मूळ घरी चिमणाबुवांना मिळालेल्या प्रासादिक मूर्तीजवळ या मूर्तीचा पंधरा दिवस निवास होता. स्थापनेच्या दिवशी ही मूर्ती कवठे गुलंद गावी आणली गेली होती.
बुवांच्या कीर्तनाचे अग्निहोत्र प्रचार आणि प्रसार हे मुख्य उद्दिष्ट होते. २०१७-१८ हे श्रींचे म्हणजेच परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष होते. हे निमित्त साधून किमान १०० ठिकाणी श्रींच्या जन्मकथेचे आख्यान सांगावे व कीर्तनाच्या माध्यमातून अग्निहोत्र सांगावे असा बुवांचा संकल्प होता . या कार्याची सुरुवात श्रींचे जन्मस्थान तसेच गंगा नदी किनारी खरगपूर, कलकत्ता येथे झाली व श्रींनी सुरुवातीचा कालखंड जेथे व्यतीत केला ती राजीम, रायपुर तसेच अमरकंटक हि क्षेत्रे, बिलासपुर, नागपूर, कवठे गुलंद ते अक्कलकोट या बुवांच्या पायी वारीतील अनेक ठिकाणी व भारतभर सर्व प्रमुख पवित्र स्थानांवर बुवांनी संकल्प कीर्तने केली.