श्री कृपेचा वर्षाव अखंड चालू होता. श्रींच्या बरोबर पहिला प्रवास मातृगयेचा घडला होता. यानंतर नानांचे अनेक प्रवास श्रींच्या बरोबर झाले. श्री जवळ घेत होते. सेवेची संधी मिळत होती. तरीसुद्धा मिळणारी सेवा अपुरीच वाटत होती. मन सेवेच्या संधीच्या शोधात होते. एकोणीसशे सत्तर सालापासून नानांच्या मनात विचारचक्र फिरू लागली होती. जो मार्ग डोळ्यासमोर आला होता तो मार्ग अपरिचित होता, पण त्याच मार्गाने जाण्याचा निश्चय होत होता. तो मार्ग म्हणजे, 'पदयात्रा ,पायीवारी'.
शरीरकष्ट घेऊन गणेश वाडीहून चालत अक्कलकोटला जावे हा विचार नानांच्या मनात निश्चित होत होता. सर्व व्यवस्था लावून मग ही पदयात्रा चालू करावी या विचारात चार वर्षे निघून गेली.एकोणीसशे चौऱ्यात्तरचा गुरुपौर्णिमा उत्सव सुरू व्हायला वीस दिवस बाकी होते. नानांचे मन म्हणू लागले, हेही वर्ष वाया घालवणार आहेस का?आता पुरे झाले हे रेंगाळणे. मनाचा निश्चय पक्का झाला.आता चालायला सुरुवात करायची. येतील त्या अडचणींना तोंड द्यायचे. श्री साथ देतीलच. श्रींना पत्र लिहून यावर्षी मी चालत येत आहे असे नानांनी कळविले. पत्राद्वारे श्रींना शब्द देऊन नानांनी स्वतःला बांधून घेतले. एक मन म्हणत होते काय हा वेडेपणा? तर दुसरे मन सांगत होते,अरे सप्त पाताळ आणि सप्तस्वर्गापलीकडे बोट धरून नेणारे 'श्री' या वाटेवरती तुला एकटे सोडतील का? इथेही ते तुला संरक्षण देतील, व्यवस्था बघतील. प्रसंगी बोट धरून नेतील, तू फक्त बाहेर पड.
आता निश्चय पक्का झाला. दिवस ठरला होता. आषाढ शुद्ध प्रतिपदा होती. नानांनी सकाळी सारे आन्हीक आटोपले.घरच्या देवांची पूजा केली.सर्व देवतांना प्रणाम केला. श्रींना नमस्कार केला, माईंचा निरोप घेऊन नानांची पाऊले एका अनामिक ओढीने अक्कलकोटच्या दिशेने चालू लागली. बरोबर नेमके सामान काय असावे आणि नसावे याची जाणीव नव्हती. अंगावरचे कपडे,अंथरूण पांघरूण, कीर्तनाचा पोशाख, झांज, चिपळी, करताल, तांब्याभांडे, बॅटरी, काही टिपणाच्या वह्यापुस्तके, अग्निहोत्राचे साहित्य, वाटेत भूक लागली तर लाह्यांचे पीठ, पावसासाठी छत्री.असा पंधरा वीस किलोचा बोजा पाठीवर घेऊन हा मुसाफिर अक्कलकोटची वाट क्रमित हळूहळू चालला होता. मनामध्ये 'हरे राम हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे',या कल्की कल्मष षोडष नामाची धून जमली होती. परा,पश्यंती आणि मध्यमेपर्यंत संवेदना येत होत्या. वैखरी मध्येच जय गुरुराज! एवढेच म्हणून त्यांना साथ देत होती.नामाच्या तालावर पाऊले पडत होती. साधारण साडेबाराच्या सुमारास घामाने निथळत मिरजला नाना पोचले. मिरजला श्री. हरी पटवर्धनांकडे व्यवस्था झाली. अनोख्या मार्गावरचा पहिला दिवस, पहिलं चालणं संपलं होतं.
दुसऱ्या दिवशी शिरढोण गाठण्यासाठी नानांनी पायांना वेग दिला. जवळचे लाह्यांचे पीठ भुकेच्या तावावर सकाळी नाश्त्यालाच संपले होते. दुपारी ज्या खाडीलकरांचे घर शिरढोणला आहे हे कळले होते ते घर बंद आढळले. पोटात भुकेचा डोंब उसळला होता. पाय चालायला तयार नव्हते. अशावेळी एका प्राथमिक शाळेतल्या शिक्षकाने आपला डबा नानांना दिला. तो डबा खाऊन दमल्याभागल्या पायांनी नानांनी रात्री कुची गाव गाठले. तेथील जोशी मास्तरांनी उत्तम स्वागत केले. रात्र तेथेच घालवली.त्यांनीच दुसऱ्या दिवशीसाठी डबा देखील दिला.त्यांचा निरोप घेऊन नानांनी दुपारी नागज गाठले. रात्रीचा मुक्काम जुनोनीच्या मठात करावा असे कोणीतरी सुचवले होते, पण मठाची अवस्था बघितल्यावर तिथे राहायला मन घेईना, म्हणून दुखऱ्या पायांना तसेच हाकत नाना संध्याकाळी पाचेगावला पोहोचले. तिथे अग्निहोत्र झाल्यावर दोन घास खाऊन घेतले.कोणीतरी सांगितले जवळच उदनवाडी नावाचे गाव आहे, तेथील मारुती मंदिरात वस्तीची सोय होईल. दुखणारे पाय पुन्हा चालू लागले.अशातच आता अंधार झाला होता. सकाळपासून पन्नास पंचावन्न किलोमीटर अंतर चालून झाले होते.भयाण काळोखात तो एकाकी रस्ता संपल्या संपेना.अशा त्या भयाण अवस्थेत नानांच्या मनाने श्रींना हाक मारली,श्री मला वाचवा, मला सांभाळा! त्याच क्षणी मागून सांगोल्याला जाणारी एसटी बस आली. नाना श्रींची इच्छा समजून एसटीत बसले. सांगोल्याला डॉक्टर केळकरांकडे मुक्काम झाला. दमलेल्या शरीराला विश्रांती व मनाला श्रीकृपेची साक्ष मिळाली.
असाच ऊन पावसाचा खेळ सहन करीत श्रींच्या कृपेची साक्ष घेत नाना चालत होते. दुपारच्या उन्हात चालणे नको म्हणून सातव्या दिवशी पहाटे तीन वाजताच मोहोळ गाव सोडले,पण दुर्दैवाने नेमके रस्त्याचे काम चालू होते. त्यासाठी पसरलेल्या काळ्या दगडांनी वाट किती बिकट आहे याची पावलोपावली साक्ष दिली. पायांच्या सुजून अक्षरशः पुऱ्या झाल्या होत्या. प्रत्येक पाऊल टाकताना पायात दाभणं टोचावे अशा वेदना होत होत्या. दुपारी बारापर्यंत सोलापूरला पोहोचू अशी कल्पना होती, पण पायांच्या या अवस्थेमुळे रात्री बारापर्यंत तरी सोलापूरला पोहोचू का हा प्रश्न नानांना पडला होता. खांद्यावरच्या सामानाचा बोजा आता पेलवत नव्हता. पायाचे तुकडे पडतायेत की काय असे वाटत होते. अशावेळी आर्त मनाने श्रींना हाक मारली,आणि मदतीसाठी तो परमेश्वर तात्काळ धावून आला. वाळूने भरलेला एक ट्रक आपणहून शेजारी येऊन थांबला. ट्रक ड्रायव्हरने विचारले, काय मामा,पायी पायी कुठे चाललाय? अक्कलकोटला पायी जातोय म्हटल्यावर तो ड्रायव्हर खाली उतरला. नानांची अवस्था बघून त्यांच्या खांद्यावरचे सामान ओढून घेत म्हणाला, काय मरायचे आहे काय? बसा ट्रकात सोलापूरला नेऊन सोडतो! त्या ड्रायव्हरने सामानासकट नानांना अक्षरशः ट्रकमध्ये कोंबले. या ट्रक ड्रायव्हरच्या रूपाने श्री तर आले नसतील? सोलापूरला नाना कुरुंदवाडकर जोशी गुरुजींच्या घरी राहिले. नानांचे पत्र पोहोचल्यापासून श्री सर्वांना सांगत होते, काणेबुवा चालत येत आहेत. श्रींना परमावधीचा आनंद झाला होता. त्याच दुपारी श्री.नाना अत्रे नानांना भेटायला आले. श्रींनीच त्यांना नानांचे क्षेम व पुढील नियोजन जाणून घेण्यासाठी पाठविले होते. नानांनी त्यांना नवमीच्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत मठात पोहोचेन असे सांगितले.तरी सुद्धा श्री पुन्हा पुन्हा नानांची चौकशी करीत होते, त्यांची वाट पाहत होते.
सकाळीच नानांनी सोलापूर सोडले.अक्कलकोटच्या बाजूने येणारे वारे अंगाला मोहरून टाकत होते.रात्री वळसंगला मुक्काम झाला. रात्री दमणूक झालेली असूनही झोप लागेना. केव्हा एकदा पहाट होतेय व केव्हा चालायला सुरुवात करतोय अशी नानांची अवस्था झाली होती. त्याच अवस्थेत पहाटे चालणे सुरू झाले. मन बेभान होऊन श्रींच्या चरणांकडे धावत होते.पण आज शरीर त्या मनाला थांबवत नव्हते. आज श्रींचे दर्शन होणार होते. सर्व वेदनांनी दूर पळ काढला होता. सूर्याच्या प्रखर किरणांतूनसुद्धा आज अमृताचा वर्षाव होतोय असेच वाटत होते.याच अवस्थेत प्रज्ञापूरच्या वेशीवर नाना पोहोचले. अंग शहारून गेले. अष्टसात्विक भाव जागृत झाले. अंगावर रोम उभे राहिले. घसा दाटून आला. भरून आलेल्या डोळ्यांनी रस्ता अंधुक दिसायला लागला. सकाळचे दहा वाजतं आले होते.नाना गुरुमंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आले तेव्हा आनंदाने कळस गाठला होता. समाधान शिगोशिग भरले होते. डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते. प्रवेशद्वारापाशी नाना आले आहेत ही बातमी मठात पसरली. जो तो त्यांना पाहायला पुढे धावत होता. पण नानांचे लक्ष मात्र कुणाकडेच नव्हते. कासावीस मनाला ओढ लागली होती श्रींच्या दर्शनाची. श्रींच्या खोली बाहेर कसाबसा तोल सावरीत नाना उभे होते. केव्हा एकदा श्रींच्या पायी लोटांगण घेईन असं त्यांना झाले होते. शारदामाता व 'श्री' नानांच्या पायांकडे एकटक पाहत होते. आपल्या लेकराचे पाय सुजले तर नाहीत ना हे भाव त्यातून व्यक्त होत होते. ते पाहून नानांचे डोळे भरून वाहायला लागले होते. शरीराला कंप सुटला होता. एवढ्यात श्रींनी आत यायची खूण केली. आवरून धरलेला हुंदका बांध फोडून बाहेर आला आणि नाना भावनावेगाने श्रींच्या पायावर आडवे झाले.श्रींचा प्रेमाचा हात नानांच्या पाठीवरून फिरू लागला. नाना उभे राहिले तेव्हा 'श्री' म्हणाले, हे एक महान तप आहे!हे एक फार मोठं पुरश्चचरण आहे बरं! श्रींच्या प्रेमाने नाना सुखावून गेले होते.एक कृतार्थता मनात दाटून आली होती. या पहिल्या पदयात्रेची अनुभूती बघता बघता शब्दबद्ध झाली. संपूर्ण पदयात्रेचा सारभूत वृत्तांत या अभंगातून साकार झाला. आपणही या अभंगाचा आनंद घेऊया.
पदयात्रेची ही बिकट वाट वहिवाट करायची हा निश्चय ठाम झाला होता. श्रींनी या पदयात्रेला एक महान पुरश्चरण म्हटले होते. हे दिव्य पुरश्चरण हातून सतत घडावे ही तीव्र इच्छा नानांच्या मनात दाटून राहिली होती. आता हे पुरश्चरण अखंड घडणार होते. त्याचे कर्तेकरविते श्रीच होते. आजपर्यंत एकुणपन्नास पदयात्रा झाल्या. म्हणजे एकुणपन्नास पुरश्चरणे झाली. या प्रत्येक पदयात्रेतील अनुभूती या एकेका स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहेत,एवढ्या या अनुभूती रम्य आहेत. विस्तारभयामुळे काही ठळक घटनांचा आढावा आपण घेणार आहोत.
दुसऱ्या पदयात्रेच्यावेळीही नाना एकटेच होते. तिसऱ्या पदयात्रेपासून श्री.आप्पाशास्त्री गाडगीळ व श्री. सुधीर जमदग्नी, कुरुंदवाड,हे दोघे सहचर मिळाले होते. एकोणीसशे सत्यात्तर सालच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी, म्हणजे चौथ्या पदयात्रेनंतर श्रींनी प्रसाद म्हणून आपल्या पादुका नानांना दिल्या. त्याआधी दोन दिवस 'श्री' म्हणाले होते, पदयात्रेसाठी अधिष्ठान देण्याचा आमच्या मनातमध्ये विचार आहे. मूर्ती द्यावी की पादुका द्याव्यात हे तुमच्या आवडीवर ठेवले आहे. यावर नाना म्हणाले, आपण जर देणारच आहात तर आपल्याला योग्य वाटेल तेच मला द्या. त्यावर दुसऱ्या दिवशी श्री म्हणाले, आपल्याला पादुका द्यायचा निर्णय आम्ही घेतला आहे. तथापि या पादुका भगवान दत्तात्रेयांच्या देऊ? का स्वामी समर्थांच्या देऊ? का आपल्याच (श्रींच्याच) देऊ? हे मात्र तुम्हीच सांगा. प्रसंग कसोटीचा होता. परीक्षेचा होता. नाना म्हणाले, प्रभू दत्तात्रेय काय, किंवा स्वामी समर्थ काय, त्या शक्ती ज्या स्वरूपात एकरूप होऊन आमच्या समोर उभ्या आहेत, तेच आमच्याकडे असावं. नानांनी असे म्हणताच श्रींना खूप समाधान झालं.प्रसन्नपणे हसत हसत श्री म्हणाले बरं, बरं! बरं,बरं !
श्रींच्या पादुकांची प्राप्ती झाली. या पादुकांचे कुरुंदवाडला जल्लोषी स्वागत झाले. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी नाना श्रींसमवेत समुद्रस्नानासाठी वाळुकेश्वर, बाणगंगा येथे गेले होते. समुद्रस्नान झाले. त्यानंतर नाना श्रींचे दर्शन घेत होते. त्यांनी श्रीं पुढे हात जोडले. तोच श्रींनी त्यांचे जोडलेले हात पकडले,नानांना जवळ ओढले, आपल्या डाव्या हातात नानांचे दोन्ही हात दाबून धरले. मस्तकाला मस्तक लावले. आपला उजवा हात नानांच्या मस्तकावर व नंतर हळुवारपणे पाठीवर फिरवीत श्री म्हणाले,' या जगातले शाश्वत ते सर्व तुमच्या हाती दिले आहे'. नानांचे डोळे भरून आले. श्रींनी जणू शक्तिपात केला होता. श्री पुढे म्हणाले,'आता आपण कल्पतरूच्या छायेत आहात बरं'. आणि खरेच श्रींनी पादुकांच्या रूपाने कल्पतरूच नानांना दिला होता.
सहाव्या पदयात्रेच्या वेळची गोष्ट आहे. पदयात्रा निघाल्यापासून श्रींच्या उजव्या पादुकेवर अंगठ्यापाशी ओंकार उमटला होता. अगदी अक्कलकोटपर्यंत हा ओंकार स्पष्ट दिसत होता. नानांनी श्रींना जेव्हा या संदर्भात सांगितले तेव्हा श्री म्हणाले, 'आम्हाला ते माहित आहे, आपण आता पूर्ण प्रकाशात आहात'.श्रींच्या सर्वसाक्षीत्वाच्या अनुभूतीने नाना खूप आनंदले होते. आता पदयात्रेचा सुगंध पसरू लागला होता. गेल्या पाच-सहा पदयात्रांपासून श्रींच्या दिव्यशक्तीची अनुभूती पावलोपावली येत होती. पहाटेच्या रम्य वातावरणात पालखीतून सुगंधाची उधळण होत असे. सारे पदयात्री पालखी भोवती जमून त्या सुगंधाच्या आनंदात रमून जात. आज हा गुलाबाचा वास, आज मोगरा, केवडा,कधी पारिजातकाचा, कधी चंदनाचा.भस्माचा सुगंध तर नित्य यायचा आणि तो सुद्धा नेमका श्रींच्या भस्मस्नानाच्याच वेळी.श्रींच्या भस्मस्नानाच्याच वेळी नेमका इकडे पालखीतून भस्माचा सुगंध पसरावा यावरून 'श्री' आणि पादुका भिन्न नाहीत हे श्री दाखवून देत होते. दहाव्या व तेविसाव्या पदयात्रेच्या वेळेचा प्रसंग आहे. रात्रीच्या प्रवासात साथ देण्यासाठी व वाट दाखवण्यासाठी श्रीकृपेने कुत्र्याची योजना झाली होती.पिराच्या माळावर वाटमारीसाठी रस्त्यावर दगड लावले गेले होते.पण बरोबरच्या कुत्र्याने झटकन बाजूची वाट दाखविली व गाड्या व्यवस्थित त्या अडचणीतून बाहेर पडल्या. तेहतिसाव्या पदयात्रेच्यावेळी सुद्धा असाच एक पांढरा कुत्रा अचानक सोबत आला. हा अग्निहोत्राला सर्वांसोबत बसायचा. सप्तश्लोकी झाली की पुढील दोन्ही पाय उंचावून नमस्कार करायचा. एकदा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी दोन चोर आले, त्यांना याने हुसकावून लावले व आपल्याला दिलेले काम पूर्ण झाल्यावर जसा आला तसाच तो गुप्त देखील झाला.
अकराव्या पदयात्रेच्या वेळी श्रीकृपेची एक विलक्षण अनुभूती आली. मंगळवेढ्याजवळची गोष्ट आहे. श्री.बाळूकाका गोखले व श्री. प्रभू गाडगीळ पहाटेच्या अंधारात चालत होते.त्याचवेळी बाळू काकांच्या पायात काटा घुसला. अंगठा व शेजारच्या बोटांमधून तो काटा वर आला होता. चालून दमलेल्या पायांना ती कळ सोसली नाही.काट्याने काटा काढावा म्हणून प्रभू गाडगीळ बॅटरीच्या उजेडात दुसरा काटा शोधू लागले.जिथे प्रथम बॅटरीचा प्रकाश पडला तेथे अंधारात काहीतरी चकाकले म्हणून तेथे बघितले,तर त्या ठिकाणी एक नवी कोरी सुई मिळाली. सुई किंचितही मळली नव्हती हे आश्चर्य, कारण त्या रात्री त्या भागात खूप पाऊस झाला होता. रस्त्यावर चिखल झाला होता. पण इतक्या चिखलात असून त्या सुईच्या वेजात सुद्धा माती गेली नव्हती. जणू कोणीतरी ती सुई मुद्दाम तिथे ठेवली होती.त्या सुईने प्रभु गाडगीळनी गोखलेकाकांच्या पायातला काटा काढला व ती सुई जवळ ठेवून दिली. पदयात्रा अक्कलकोटला पोहोचली. अक्कलकोटला पोहोचल्यावर नाना पालखी समोर जमलेल्या पैशांचा हिशोब श्रींना देत असत. तसा तो हिशोब नाना सांगू लागल्यावर श्री म्हणाले, पैसा कितीही येईल व कितीही जाईल.तुम्ही करत असलेला विनियोग योग्य असेल याची आम्हाला खात्री आहे. तथापि खरोखरीच जर काही शिल्लक ठेवायचे असेल,जपून ठेवायचे असेल तर ती सुई जपून ठेवा, जी मंगळवेढ्याच्या मार्गावर सापडली आहे. या सुईच्या दर्शनासाठी भविष्यकाळ आपल्या घरी धावून येणार आहे.
एक ना अनेक अशा गोष्टी जेव्हा वेळोवेळी घडतात, सभोवतालची सर्व माणसे त्याचा अनुभव घेतात, तेव्हा प्रत्येक वेळी त्याला योगायोग म्हणणार का? ती ईश्वरी योजना असते हेच मान्य करणे हे शहाणपणाचे ठरेल.
बुवांच्या कीर्तनाचे अग्निहोत्र प्रचार आणि प्रसार हे मुख्य उद्दिष्ट होते. २०१७-१८ हे श्रींचे म्हणजेच परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष होते. हे निमित्त साधून किमान १०० ठिकाणी श्रींच्या जन्मकथेचे आख्यान सांगावे व कीर्तनाच्या माध्यमातून अग्निहोत्र सांगावे असा बुवांचा संकल्प होता . या कार्याची सुरुवात श्रींचे जन्मस्थान तसेच गंगा नदी किनारी खरगपूर, कलकत्ता येथे झाली व श्रींनी सुरुवातीचा कालखंड जेथे व्यतीत केला ती राजीम, रायपुर तसेच अमरकंटक हि क्षेत्रे, बिलासपुर, नागपूर, कवठे गुलंद ते अक्कलकोट या बुवांच्या पायी वारीतील अनेक ठिकाणी व भारतभर सर्व प्रमुख पवित्र स्थानांवर बुवांनी संकल्प कीर्तने केली.