narayanbuwa kane


गीत नानाई

पृष्ठ 13

दोनहजार सतरा व अठरा अशी सलग दोन वर्षे नागपूरला श्री. मोहनराव केळकरांकडे कीर्तन व दत्तगीत गायनाच्या कार्यक्रमानिमित्त नानांचे जाणे झाले होते. दोनहजार एकोणीसच्या मध्यापासून माईंच्या तब्येतीच्या तक्रारी वाढल्या होत्या. तशातही माझ्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या दहाव्या व बाराव्यासाठी नाना व माई नेवऱ्याला आले होते. दोन दिवस राहून नाना व माई परत कवठ्याला गेले होते. डिसेंबरमध्ये माईंची तब्येत खूपच खालावली होती.जानेवारीच्या पहिल्या दोन दिवसातच माई घरात पडल्या. मांडीचे हाड मोडले होते. त्याचे ऑपरेशन करावे लागले. ऑपरेशननंतर माईंची तब्येत आणखीनच खालावली. त्या कोमात गेल्या होत्या. दवाखान्यामधून त्यांना घरी आणले गेले. नानांचा सर्व परिवार घरी जमा झाला होता.आठ-दहा दिवस माई कोमातच होत्या. जणू काही त्या उत्तरायण लागायचीच वाट पाहत होत्या.सव्वीस जानेवारी दोनहजार वीस या दिवशी माईंचे महानिर्वाण झाले. नानांचे शक्तीस्वरूप श्रीतत्वात विलीन झाले. जणू काही नानांच्या आगमनासाठीची पूर्वतयारी करण्यासाठीच माई नीजस्थानी गेल्या. सारा परिवार शोकाकुल होऊन म्हणत होता.

आईविना मी आज पोरका
दु:ख उरी अनिवार
उदासवाणे झाले
तुटला मायेचा आधार ||धृ||
आई आणि ईश्वर नाती
मिळती ज्या चरणाशी
ती आई जाता झालो
जगात मी वनवासी
प्रेमळ नाते हृदयाचे ते
पुन्हा कुठे मिळणार ||१||
ज्या उदरी मी जन्म घेतला
मांडीवर खेळलो
कुशीत शिरूनी मायेचा त्या
पान्हा मी प्यालो
ती माया ते प्रेम निराळे
होती अमृतधार ||२||
घार फिरे नित गगनी
परी, लक्ष पिलापाशी
पिल्लू इथले गगनी उडते
घार घरापाशी
पहात होती वाट निरंतर
नयनी अश्रूधार ||३||

नानांना झालेले दुःख शब्दांच्या पलीकडचे होते. ज्या माईंनी त्यांचा संसार,सुखाचा संसार केला, प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे साथ दिली, ज्या पावलांच्या पुण्याईने नानांची त्यांच्या भाग्यविधात्या सद्गुरूचरणांची भेट झाली, ती पावलं आपल्या पाऊलखुणा मागे ठेवून अनंतात विलीन झाली होती. संसाररथाचे एक चाक अवचितपणे निखळले होते.माईंचे उर्ध्वदेहीक संस्कार पार पडले. कोणत्याही संकटात न डगमगणारे नाना माईंच्या जाण्याने एकदम खचून गेले. पण त्याही परिस्थितीत,' लोकसंग्रह हे आपले कार्य आहे याची जाणीव ठेवा', ही श्रींची आज्ञा नाना विसरले नव्हते. जानेवारी महिन्यातच नागपूरला श्री. मोहनराव केळकर यांनी गीत समर्थायन हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी त्यांची कन्या खास अमेरिकेतून आली होती. माईंच्या अनपेक्षित जाण्याने हा कार्यक्रम रहित करावा लागला होता. केळकर यांची मुलगी अमेरिकेतून या कार्यक्रमाला आली आहे,तिला या कार्यक्रमातील किमान एक गीत तरी ऐकू दे, म्हणून या कार्यक्रमातील पहिले गीत नानांनी तिला फोनवर ऐकवले होते.गुरूआज्ञेचे पालन करताना वैयक्तिक सुखदुःख त्या आड येऊ द्यायचं नाही हा वस्तूपाठ नाना आपल्या आचरणातून देत होते.

माईंच्या निधनानंतर काही दिवसांनी हवापालटासाठी म्हणून नाना माझ्याकडे पंधरा-वीस दिवस राहायला आले होते. याच दरम्यान बावीस फेब्रुवारीला त्यांनी मला सर्वांना एक संदेश देण्यासाठी सांगितले. तो संदेश म्हणजे एक प्रार्थना होती.बावीस तारखेला सर्वांनी स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी,तसेच आपला परिसर, तालुका,जिल्हा,राज्य, राष्ट्र व जगाच्या आयुरारोग्य, स्वास्थ्य व समाधानासाठी ती प्रार्थना करायची होती. नानांच्या सांगण्यानुसार मी सर्वांना हा संदेश दिला होता. ही प्रार्थना करण्यासाठी सांगण्यामागचे कारण पुढच्या महिन्यातच स्पष्ट व्हायचे होते. एका काळ्या विषाणूची छाया जगावर पसरत होती. बरोबर बावीस मार्चला कोरोनामुळे लॉकडाऊन लागले होते. या प्रार्थनेच्या माध्यमातून नानांनी सर्वांना संरक्षक कवच प्रदान केले होते.

बारा मार्च जागतिक अग्निहोत्र दिवस. या दिनविशेषानिमित्त पटवर्धनवाडी, रत्नागिरी येथे नानांचे कीर्तन आयोजित केले होते. जाहीर कार्यक्रमातले हे नानांचे अखेरचे कीर्तन ठरले.त्यादिवशी सकाळच्या गणेशयागात नाना उत्साहाने सामील झाले होते. संध्याकाळी पाच ते सात कीर्तन व सामूहिक अग्निहोत्र देखील झाले. त्यावेळी वाटले देखील नव्हते की आपण नानांचे शेवटचे कीर्तन ऐकतोय. नाना नेवऱ्यातून ठाण्याला जाणार होते पण कोरोनाच्या वाढत्या बातम्यांमुळे घरी कवठ्याला जायचे ठरले. मी त्यांना कवठ्याला सोडून आलो. सगुण रूपात झालेली ती अखेरची भेट आहे याची तेव्हा पुसटशी देखील जाणीव नव्हती. कोरोनाचा विळखा वाढतच होता. सर्व व्यवहार ठप्प झाले होते. नाना प्रदीर्घ काळानंतर सलग घरी होते. या काळात संकेतला कीर्तन शिकवणे, स्नेहाताईला पेटी शिकवणे त्यांनी आवर्जून केले. आता त्यांच्याशी संपर्क हा व्हिडिओ कॉलवरूनच होत होता. अशातच जून महिना उजाडला. अक्कलकोटची पायीवारी कशी करणार हा प्रश्न होता. कोरोनामुळे कोणत्याही वारीला सरकारी स्तरावरून परवानगी मिळाली नव्हती. नानांच्या जीवाची तगमग चालू होती. श्रीजीच साह्यकर्ते झाले व एक दिवसासाठीचा प्रवासाचा पास मिळाला. भालूदादा कडेकरने स्वतःच्या गाडीने नानांना अक्कलकोट शिवपुरीला नेऊन आणले. कोणतेही कार्यक्रम या काळात होऊ शकत नव्हते म्हणून शिवपुरीतून श्रीजींच्या आठवणींवर एक फेसबुक लाईव्ह कार्यक्रम पूज्य दादा महाराजांनी नानांसोबत केला होता. हे नवीन तंत्र सुद्धा नानांनी झटकन आत्मसात केले होते.

सप्टेंबर महिन्यामध्ये नानांना थोडा विरंगुळा मिळावा म्हणून हेमाताई त्यांना चिंचवडला घेऊन गेली होती. दहा सप्टेंबरला नानांनी मला एक स्वप्नदृष्टांत दिला होता. स्वप्नदृष्टांत असा होता, मी रत्नागिरीतील सावरकर पुतळ्याजवळ होतो. एवढ्यात मला नाना तेथे चालत येताना दिसले. मी झटकन पुढे जाऊन, नाना इकडे कधी आलात म्हणून विचारले.त्यांनी मला घट्ट मिठी मारली. स्वप्नातही तो स्पर्श जाणवत होता. मी नानांच्या खांद्यावर बंदूक बघितली आणि आश्चर्याने त्यांना ही बंदूक कशासाठी म्हणून विचारले.नाना म्हणाले,' राष्ट्रकार्यासाठी बाहेर पडण्याची वेळ आली आहे,मला जायला हवं'. यापुढे तू एक कर, माझ्या रचनांमधील स्तोत्र नित्यपाठात ठेव.माझ्या खांद्यावर हात ठेवून नाना चालत होते. नेवऱ्याकडे जाणारा रस्ता आल्यावर नाना मला म्हणाले,आता तू तुझ्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने जातो. आम्ही दोघेही वळलो आणि ते स्वप्न संपले. दुसऱ्या दिवशी मी सकाळी नानांना फोन केला त्यासरशी ते पहिलं वाक्य बोलले, तुला सांगितलेल्या मार्गावर तू जा, माझ्या मार्गावर मी जातोय. काय समजायचे ते मी समजलो होतो. गळ्यात दाटून आलेला आवंढा मला गिळता येईना. त्या फोनवर काहीही न बोलता मी फोन ठेवला होता. संकेत काय आहे ते लक्षात आले होते. दुसऱ्या दिवशी फोनवर नानांनी ब्राह्म मुहूर्त गाठायचा आहे असे सांगितले. त्यादरम्यान मी त्यांना त्यानीच लिहिलेल्या 'मर्यादा पुरुषोत्तम' या श्रीजींवरील पुस्तकाचे रोज एक प्रकरण वाचून दाखवीत होतो. रोज वाचन झाल्यावर नाना पुढचा भाग काय आहे हे विचारीत. त्या दिवशीच्या वाचनानंतर मी त्यांना उद्या हा भाग आहे असे म्हटले त्यावर ते काहीही बोलले नाहीत. आज घरातल्या सर्वांजवळ मला बोलायचे आहे,सर्वांजवळ फोन दे असे नानांनी सांगितले. ते सर्वांशी भरपूर बोलले. सगळ्यांना त्यांनी कल्याणमस्तु असा आशीर्वाद दिला व आईला आता विनयकडे फोन दे असे सांगितले. मी फोन घेतल्यावर 'चला परिक्रमा संपली' एवढेच वाक्य नाना बोलले. माझ्या नशिबाने मला तो शेवटचा ठरलेला फोन कॉल रेकॉर्ड करायची बुद्धी झाली होती.

त्याच रात्री साधारण दहा वाजण्याच्या दरम्यान नानांनी स्व-रचित 'अमूल्य जीवन सुवर्णसंधी, त्यजुनी अवखळपणा,मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा' हे गीत म्हटले व ते झोपी गेले. रात्री दीडच्या दरम्यान त्यांना उलटी झाली,पण मी बरा आहे असे हेमाताईला सांगून नाना झोपी गेले.पहाटे नेहमीच्या वेळी नाना उठले का नाहीत हे बघायला हेमाताई गेली तेव्हा नाना श्रीचरणी विलीन झाले होते. श्रींचा हा लीलासाथी आपले अवतारकार्य आटोपून श्रींच्या दरबारात सकाळचे अग्निहोत्र करायला उपस्थित झाला होता. सारा परिवार शोक सागरात बुडून गेला. सर्वत्र फोनाफोनी झाली.रात्रीपर्यंत व्यवस्थित असणारे नाना सकाळच्या अग्निहोत्राला आपल्यात नाहीयेत हे पचविणे सर्वांना जड झाले होते. आता पुन्हा त्यांचे सगुण रुपात दर्शन नाही. त्यांनी प्रेमाने पाठीवर मारलेला बुक्का आता कधीच अनुभवता येणार नाही. ते प्रेम, ते कौतुक सारे सारे संपले. आता फक्त त्यांच्या आठवणी.

अंधार,अंधार, अंधार .......
सरली गाथा सरले गाणे
थरथरला गंधार ||धृ||
तरुवेलींचे हसणे सरले
रविचंद्राची प्रभा झाकळे
वेदघोष जयघोष संपले
बोथट हो असीधार ||१||
आता कुणास्तव जगी या जगणे
जगुनी काय या जगी पाहणे
नियतीची त्या चरणे धरणे
हाचि एक परिहार ||२||
श्वास थांबला कुडी राहिली
सर्व कवाडे बंदची झाली
गंध संपला माती उरली
उरले ते जडभार ||३||

नानांचे अंत्यसंस्कार कवठ्यालाच करायचे ठरले. महापालिकेतून नैसर्गिक मृत्यूचे प्रमाणपत्र मिळायला बारा वाजून गेले.त्यानंतर ॲम्बुलन्समधून नानांचे पार्थिव बर्फातून कवठ्याला आणले गेले. जशी ॲम्बुलन्स गेट जवळ आली तशी नानांची गाय गोठ्यातून जोरात हंबरायला लागली. नानांचा लाडका कुत्रा करूण आवाजात ओरडू लागला. मुक्या प्राण्यांनासुद्धा आता आपल्या पाठीवर नानांचा प्रेमळ हात फिरणार नाहीये ही जाणीव झाली होती. नानांचे पार्थिव अतिशय तेजस्वी दिसत होते. जणू ते योगसमाधीतच होते.देह त्यागुन सतरा तास झाले होते तरीही त्यांच्या टाळूवर लावलेले लोणी वितळत होते. अतिशय तेजस्वी असे ते अंतिम दर्शन होते. नानांच्या घराजवळील शेतातच त्यांचे अंतिम संस्कार झाले.अग्निमंदिरात सायंकाळचे अग्निहोत्र चालू असतानाच नाना अंतिम संस्कार स्वीकारत होते यावरून अग्निहोत्र प्रचाराच्या कार्याशी ते किती एकरूप झाले होते हेच दिसते.

नानांच्या आयुष्याचे सार एका ओळीत सांगायचे झाले तर, प्रखर गुरुभक्ती व गुरुआज्ञेचे काटेकोर पालन.त्यांच्या चरित्राचे खरे दर्शन यातुनच घडु शकते. नानांच्या चरित्राचे यथार्थाने आकलन होण्याची माझी कोणतीही पात्रता नाही. माझ्या वकूबानुसार जे दर्शन मला घडले ते कोणताही अभिनिवेश व 'मी' मध्ये न आणता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही त्याचे दर्शन जर या लिखाणातून घडत असेल तर सर्वांचा मी क्षमाप्रार्थी आहे. ही साहित्यरुपी सेवा श्रीगुरु चरणी अर्पण करून सर्वांसाठी मागणे मागतो, हे श्रीगुरो, 'श्री' प्रतिपादित पंचसाधन मार्गावर आमची वाटचाल करून घ्यावी. आमचे दोष, चुका पोटात घालून आमचे कल्याण करावे. आम्ही आपल्याला पूर्णत्वाने शरण आलो आहोत.

|| हरी ओम तत सत ||

झाली पुजा झाली आरती
सद्गुरू आनंदे डोलती ||धृ||

सद्गुरू येती प्रेमसुखे
मला भेटण्या प्रेमकौतुके
भजनानंदे धुंद होऊन
स्वये सुखे नाचती ||१||

सद्गुरू प्रेमे उभे राहती
स्मितमुद्रा अभयदान देती
लोटांगण पदी भक्त घालता
सुखे रहा म्हणती ||२||

झाली पुजा झाली आरती
सद्गुरू अपुल्या राऊळी जाती
फिरुनी भजन नादची उठता
परतुनी येईल गुरुमुर्ती ||३||

कार्यक्रम

परमसद्गुरू श्री गजानन महाराज जन्मशताब्दी वर्ष (१७ मे २०१७-१८)
श्री महाराज जन्मकथा संकल्प भारत दौरा

बुवांच्या कीर्तनाचे अग्निहोत्र प्रचार आणि प्रसार हे मुख्य उद्दिष्ट होते. २०१७-१८ हे श्रींचे म्हणजेच परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष होते. हे निमित्त साधून किमान १०० ठिकाणी श्रींच्या जन्मकथेचे आख्यान सांगावे व कीर्तनाच्या माध्यमातून अग्निहोत्र सांगावे असा बुवांचा संकल्प होता . या कार्याची सुरुवात श्रींचे जन्मस्थान तसेच गंगा नदी किनारी खरगपूर, कलकत्ता येथे झाली व श्रींनी सुरुवातीचा कालखंड जेथे व्यतीत केला ती राजीम, रायपुर तसेच अमरकंटक हि क्षेत्रे, बिलासपुर, नागपूर, कवठे गुलंद ते अक्कलकोट या बुवांच्या पायी वारीतील अनेक ठिकाणी व भारतभर सर्व प्रमुख पवित्र स्थानांवर बुवांनी संकल्प कीर्तने केली.

संकल्प दौरा कीर्तने

  • क्र. ११४- श्री. महालक्ष्मी मंदीर, कल्याण
  • क्र. ११३- ज्येष्ठ नागरिक संघ, डोंबिवली
  • क्र. ११२- औरंगाबाद
  • क्र. १११- कोंडे, राजापूर
  • क्र. ११०- श्री. आपटे, गोवा
  • क्र. १०९- कराड
  • क्र. १०८- गजानन महाराज मंदिर, उज्जैन
  • क्र. १०७- श्री. रामनवमी उत्सव, आपटा
  • क्र. १०६- श्री. कुलकर्णी, पनवेल
  • क्र. १०५- गणपती मंदिर, डोंबिवली
  • क्र. १०४- हनुमान मंदीर, बदलापूर
  • क्र. १०३- वांगणी, बदलापूर
  • क्र. १०२- बदलापूर, श्री कुवळेकर
  • क्र. १०१- सोलगाव, राजापूर, रत्नागिरी
  • क्र. १००- विश्व अग्निहोत्र दिन समारोह, रत्नागिरी
  • क्र. ९९- श्री. घरत, गणेशपुरी
  • क्र. ९८- श्री. पटवर्धन, कल्याण
  • क्र. ९७- श्री. कौपिनेश्वर देवस्थान, ठाणे
  • क्र. ९६- श्री. गजानन महाराज मंदिर, डहाणू
  • क्र. ९५- वाकवली
  • क्र. ९४- शिवथरघळ
  • क्र. ९३- श्रीवर्धन
  • क्र. ९२- श्री. हरवंदे, महाड
  • क्र. ९१- तळा
  • क्र. ९०- गाणगापूर
  • क्र. ८९- सोनामाता विद्यालय, सोलापूर
  • क्र. ८८- हनुमान मंदिर, श्री. केळकर, नागपूर
  • क्र. ८७- रथसप्तमी उत्सव, श्री. कठाळे, नागपूर
  • क्र. ८६- श्री. काळकर, मुलुंड, मुंबई
  • क्र. ८५- मोरजी, गोवा
  • क्र. ८४- ब्रह्मदेव देवस्थान, ब्रह्माकरमळी, सत्तरी, गोवा
  • क्र. ८३- साखळी, गोवा
  • क्र. ८२- श्री योगेश्वरी देवी संस्थान, म्हापसा, गोवा
  • क्र. ८१- अग्नीहोत्र मंदिर, श्री. आपटे, म्हापसा, गोवा
  • क्र. ८०- शृंगेरी
  • क्र. ७९- दत्तमंदिर, ठाणे
  • क्र. ७८- बालाजी मंदिर, कल्याण
  • क्र. ७७- दत्तजयंती उत्सव, कवठेगुलंद
  • क्र. ७६- उपासनी बाबा आश्रम, साकोरी
  • क्र. ७५- श्री. साईबाबा देवस्थान, शिर्डी
  • क्र. ७४- श्री. मोरया गोसावी देवस्थान उत्सव, चिंचवड
  • क्र. ७३- गणेशवाडी
  • क्र. ७२- श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव, पुणे
  • क्र. ७१- कुरुक्षेत्र
  • क्र. ७०- मथुरा
  • क्र. ६९- महाराष्ट्र भवन दिल्ली
  • क्र. ६८- हृषिकेश (संगम)
  • क्र. ६७- हरिद्वार
  • क्र. ६६- गया
  • क्र. ६५- बुद्धगया
  • क्र. ६४- प्रयाग (त्रिवेणी संगम)
  • क्र. ६३- काशी
  • क्र. ६२- अयोध्या
  • क्र. ६१- सोनामाता मंदिर, सिद्धपुर (मातृगया), गुजरात
  • क्र. ६०- साईमंदिर, भद्रा, अहमदाबाद
  • क्र. ५९- दत्तमंदिर, चांदखेडा, अहमदाबाद
  • क्र. ५८- श्री गिरनार पर्वत पायथा, जुनागड
  • क्र. ५७- प्रभास तीर्थ क्षेत्र, गुजरात
  • क्र. ५६- सोमनाथ मंदीर, गुजरात
  • क्र. ५५- द्वारका, गुजरात
  • क्र. ५४- बेट द्वारका, गुजरात
  • क्र. ५३- नारेश्वर, गुजरात
  • क्र. ५२- गरुडेश्वर, गुजरात
  • क्र. ५१- दहेज, गुजरात
  • क्र. ५०- बडोदा
  • क्र. ४९- श्री परशुराम मंदिर, संगम माहुली, सातारा
  • क्र. ४८- लईराई देवीसंस्थान, शिरगाव, गोवा
  • क्र. ४७- दत्तमंदिर, भोर, महाराष्ट्र
  • क्र. ४६- ब्रह्मानंद स्वामी मठ, कागवाड, महाराष्ट्र
  • क्र. ४५- कवठेगुलंद, कन्यागत महापर्वकाळ समाप्ती उत्सव
  • क्र. ४४- विठ्ठल मंदिर, गणेशवाडी
  • क्र. ४३- चिकुरडे, सांगली
  • क्र. ४२- रावेर, जामखंडी, बेळगाव
  • क्र. ४१- ढोल्या गणपती मंदिर, वाई
  • क्र. ४० कागवाड
  • क्र. ३९ मिरज किल्ला भाग
  • क्र. ३८ दड्डी
  • क्र. ३७ वरणगे पाडळी
  • क्र. ३६ पट्टणकोडोली
  • क्र. ३५ चिपळूण
  • क्र. ३४ श्री क्षेत्र परशुराम
  • क्र. ३३ गणपतीपुळे
  • क्र. ३२ संगमेश्वर
  • क्र. ३१ देवरुख
  • क्र. ३० साखरपा
  • क्र. २९ रत्नागिरी
  • क्र. २८ श्री परशुराम मंदिर, बाणगंगा, वाळकेश्वर, मुंबई
  • क्र. २७ सौरभ कार्यालय बावधन पुणे
  • क्र. २६ श्री राममहाराज भक्तमंडळी, रंकाळा संध्यामठ कोल्हापूर
  • क्र. २५ गुरुमंदिर, अक्कलकोट
  • क्र. २४ सोलापूर
  • क्र. २३ वाघोली
  • क्र. २२ मंगळवेढा
  • क्र. २१ पंढरपूर
  • क्र. २० खर्डी
  • क्र. १९ सांगोला
  • क्र. १८ कुची
  • क्र. १७ मिरज
  • क्र. १६ सांगली
  • क्र. १५ बालाजी मंदिर नागपूर
  • क्र. १४ गजानन महाराज मंदिर, महाल, नागपूर
  • क्र. १३ नागपूर
  • क्र. १२ मुर्तीजापूर (बाळप्पा मठ)
  • क्र. ११ कारंजा (दत्त जन्मस्थान)
  • क्र. १० अमरावती
  • क्र. ९ काटोल (चंडिका मंदिर)
  • क्र. ८ नागपूर (मानेगाव दत्तमंदिर)
  • क्र. ७ अमरकंटक
  • क्र. ६ रायपूर
  • क्र. ५ राजीम (राजीव लोचन मंदिर)
  • क्र. ४ बिलासपूर गजानन महाराज मंदिर
  • क्र. ३ बेल्लूर मठ कलकत्ता
  • क्र. २ दक्षिणेश्वर मठ कलकत्ता
  • क्र. १ खरगपूर (श्रींचे जन्मस्थान)