narayanbuwa kane


गीत नानाई

पृष्ठ 11

गिरनार पर्वतावर जाऊन श्रीदत्तप्रभूंचे दर्शन घ्यावे ही नानांच्या मनात खूप वर्षाची इच्छा होती. श्री असताना जुनागड, सोमनाथ, द्वारकाक्षेत्री त्यांच्याबरोबर जाण्याचा योग काही वेळा आला होता,पण गिरनारवर जाणे घडले नव्हते. यावेळी गिरनारला जायचे नानांनी नक्की केले. सोबतीला त्यांचा नातू कौस्तुभ व माझे बाबा होते. नानांचे वय सत्तर व माझ्या बाबांचे वय पासष्ठ. चिंचवडला एकत्र येऊन हे तिघेजण सोमनाथ, द्वारकाकरून जुनागडला पोहोचले. संध्याकाळी जुनागड शहरात फिरताना नानांच्या ढोपराला काहीतरी लागले.रिक्षात चढता पण येईना एवढा गुडघा दुखायला लागला होता. किरकोळ पेनकिलर घेऊन नाना झोपी गेले. रात्री दीड वाजता उठून हे तिघेजण गिरनारच्या पायथ्याशी आले. साधारण दोनअडीचला यांनी गिरनार चढायला सुरुवात केली. साधारण पाच हजार पायऱ्यांच्या टप्प्यानंतर नानांच्या गुडघेदुखीने परत डोके वर काढले. चढाव होता तोपर्यंत काही वाटले नाही, पण उतारावर त्रास खूपच जाणवत होता.तरीही नाना वेदना पचवीत चालत होते. शेवटच्या हजार बाराशे पायऱ्या शिल्लक असताना पाय खूपच दुखायला लागला. कौस्तुभ व बाबांच्या आधारानेसुद्धा त्यांना चालता येईना, तेव्हा एक अघटीत घडले, शिखरावरून एक काळा कुत्रा धावत आला.त्याने नानांच्या दुखऱ्या गुडघ्यावर आपली शेपटी मारली. थोड्याच वेळात दुखणारा गुडघा दुखायचा थांबला व सूर्योदयाच्या आधी थोडा वेळ हे तिघे गुरुशिखरावर पोहोचले. नानांनी तिथे अग्निहोत्र केलं, व्याहृती केली व मृत्युंजय मंत्राचे हवन देखील केले. तेथील पुजाऱ्यांनी नानांना गीत सादर करायला सांगितले.सकाळी साडेदहा वाजताच हे तिघेही गिरनार उतरून खाली परत देखील आले.घरी आल्यावर हा सर्व वृत्तांत बाबांनी मला सांगितला.आपल्या विचारांच्या कक्षेच्या बाहेर अनेक गोष्टी घडत असतात हेच खरे. पुढे नाना, बाबांना व हरवंदे कुटुंबीयांना बरोबर घेऊन पीठापूर व कुरवपूरला देखील जाऊन आले.या दोन्ही वेळच्या यात्रांचे वर्णन बाबांकडून मी ऐकले आहे. खूप छान अनुभूती त्यांना यावेळी आल्या होत्या.

नानांच्या बाबतीतला एक दिव्य अनुभव डोंबिवलीचे श्री. विद्याधर शेंबेकर यांना आला होता. बुद्धीच्या कसोटीवर या अनुभवाची उकल करणे खरोखरी कठीण आहे.घडले असे होते, संध्याकाळी साधारण साडेपाच पावणेसहाची वेळ होती. डोंबिवली येथील चाळीतील पहिल्या मजल्यावरील श्री.शेंबेकरांच्या घरी नाना अतिशय गडबडीत आले होते. शेंबेकर घरी नव्हते. त्यांच्या सौभाग्यवतींनी नानांचे स्वागत केले. नाना त्यांना म्हणाले, मला जरा गडबड आहे, विद्याधरसाठी शाल आणली आहे, ती त्याला दे. असे म्हणून नानांनी ती शाल वहिनींजवळ दिली व मी निघतो असे ते म्हणाले. त्या म्हणाल्या,निदान दूध तरी घ्या. नाना मी गडबडीत आहे नको म्हणाले. वहिनी किमान साखर तरी घ्या म्हणून त्या दोन खोल्यांच्या घरात आतल्या खोलीत साखर आणायला गेल्या. साखर घेऊन बाहेर येईपर्यंत नाना निघून गेले होते म्हणून त्या त्यांना बघायला दरवाज्याच्या बाहेर आल्या. पण नाना कुठे दिसले नाहीत म्हणून त्या खालती वाकून पाहत होत्या. एवढ्यात श्री.शेंबेकर जिना चढून वरती येताना त्यांना दिसले.त्यांनी वहीनींना कुठची अगरबत्ती लावली आहेस ? छान वास येतोय असे विचारले. वहिनींनी त्यांना नाना येवून गेले, जिन्यात भेटले का असे विचारले. पण खालून चालत जिन्याने येणाऱ्या श्री. शेंबेकरना नाना भेटले नव्हते.तेवढ्या त्या मिनिटभराच्या वेळात नाना कोठे गेले यावर ते दोघे विचार करीत होते. शेंबेकरांनी ती प्रासादिक शाल कृतज्ञतेने आपल्या कपाटात ठेवून दिली. दोनच दिवसानंतर माझा गुरुबंधू श्री. एकनाथदादा सहस्रबुद्धे यांच्याबरोबर नाना श्री. शेंबेकरांकडे गेले. त्यावेळी दोघे पती-पत्नी घरीच होते. दोघांनीही नानांना परवा एकदम नाहीसे कुठे झाला असे विचारले. नानांना काहीच कळेना तेव्हा शेंबेकरनी घडलेला सर्व प्रसंग व ती शाल नानांना दाखवली, व एवढ्या गडबडीत कोठे गेलात असे विचारले. नानांनी ती शाल हातात घेतली,मस्तकी धरली,त्यांचे डोळे भरून आले. ते शेंबेकरांना म्हणाले,गेले पाच दिवस मी डोंबिवलीतच आहे हे खरे आहे, पण पाच ते सात वेळेत माझी कीर्तने चालू आहेत.तुम्ही म्हणता परवा साडेपाच वाजता मी येथे आलो होतो, पण त्या वेळेला तर माझे कीर्तन चालू होते, मग मी मध्येच इथे येणे कसे शक्य आहे ? सगळेच जण या झाल्या प्रकाराने चक्रावून गेले होते. पुढे एकदा आम्ही नानांच्या घरी जो वार्षिक कार्यक्रम करायचो, त्या कार्यक्रमात मुद्दाम श्री. शेंबेकरना ती शाल घेऊन बोलावले होते. त्या प्रासादिक शालीचे आम्ही सर्वांनी दर्शन घेतले आहे. याप्रसंगानंतर नाना नेवऱ्याला आले असताना नानांना मी मुद्दाम याबद्दल विचारले होते.तेव्हा नाना मला म्हणाले होते, यात माझे काहीही मोठेपण नाही.सद्गुरु आपल्या शिष्याचा महिमा वाढवीत असतात.त्यामुळे श्री काय ते जाणोत. त्यांची लीला त्यांनाच माहीत. मी अशा गोष्टींकडे लक्ष सुद्धा देत नाही. यावर मी त्यांना नमस्कार केल्यावर माझ्या पाठीवर बुक्का मारून नाना फक्त हसले होते. एकी साथ सात स्वरूप | धरी देव बहुरूप अरूप | असे दत्तबावनीत वाचले होते. रामदास स्वामींनी एकाच वेळी सात घरी भिक्षा मागितली होती हे देखील माहीत होते. पण आजच्या काळात देखील अशा घटना घडतात व ती घटना ज्यांच्या बाबतीतली आहे त्या नानांना प्रदीर्घकाळ आपण ओळखत आहोत,त्यांचा स्पर्श ,त्यांच्याशी संवादाचे भाग्य आपल्याला लाभले आहे. बुद्धीच्या कसोटीवर कितीही घासून घ्यायचे म्हटले तरी या घटनेचे उत्तर मिळत नाही.आणि आपल्याला उत्तर मिळत नाही म्हणून या घटनेचे अस्तित्वच नाकारायचं का ? नाना, नाना म्हणत ज्यांच्याशी हास्यविनोद केला, ज्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो, ते एकाचवेळी दोन दोन ठिकाणी उपस्थित होते,ते सुद्धा अगदी आत्ता आत्ता दहा पंधरा वर्षांपूर्वी, याला चमत्कार, श्रींची लीला किंवा भ्रम, काहीही नाव द्यावे, पण हे सर्व देणारा आपल्या इतका निकट होता पण आम्ही त्यांना ओळखू शकलो नाही हे तर निश्चितच मान्य करायला हवे ना?

नानांची कीर्तन सेवा अखंड चालू होती. गुरुआज्ञेने कीर्तनातून अग्निहोत्राचा प्रचार देखील अखंड चालू होता. आत्ताचे ठीक आहे, आज अग्निहोत्राला जगन्मान्यता मिळाली आहे. पण सुरुवातीचे दिवस असे नव्हते. कीर्तनातून अग्निहोत्र सांगताना नानांना अनेकांचा विरोध सहन करावा लागला होता. काही सहकिर्तनकार तर उघडपणे म्हणू लागले होते, काणेबुवांचे कीर्तन चांगले असते,पण हल्ली मध्येच अग्निहोत्राचे काहीतरी सांगून बुवा रंगाचा बेरंग करतात.काही उत्सवातून कीर्तनातून अग्निहोत्र सांगू नका असेही सांगितले जाऊ लागले होते.चरितार्थाचे साधन पणाला लागले होते,पण नाना अविचल होते. त्यांची श्रींच्यावरची निष्ठा दृढ होती. त्यांनी असे उत्सव सोडले, पण कीर्तनातून अग्निहोत्र सांगणे सोडले नाही. अशा कठोर परीक्षेतून नाना पुढे जात होते, आणि श्रींची कृपा तर अशी की असा एखादा उत्सव सोडावा तर अपेक्षाही नसेल अशा ठिकाणाहून कीर्तनाचे आमंत्रण येई. तसेही बघितले तर नानांनी कीर्तनातून भगवद्कथेचा कधीच विक्रय केला नाही. मानधन हा त्यांच्या दृष्टीने गौण विषय होता. मुख्य होते ते गुर्वाज्ञेचे पालन. श्रींनी नानांना स्पष्ट सांगितले होते की, आपण जे अन्नोदक घेत आहात ते अग्निहोत्र प्रचारासाठी आहे, तसेच लोकसंग्रह हे आपले कार्य आहे याची सदैव जाणीव असावी. आणि नानासुद्धा श्रींच्या या आज्ञांचे काटेकोरपणे पालन करीत होते.

गुरुआज्ञेचे पालन नानांनी किती काटेकोरपणे केले होते हे मला जवळून बघता आले. अखंड दिवसात कोणाला त्यांनी अग्निहोत्र सांगितले नाही असे कधीच झाले नाही. कीर्तनानिमित्त नानांना प्रचंड प्रवास करावा लागला. अतिशय धावपळीचं त्यांच आयुष्य होतं, पण एवढ्या धावपळीच्या, थकवून टाकणाऱ्या आयुष्यातसुद्धा त्यांनी अग्निहोत्र सांगितलं नाही असं कधीच घडलं नाही. मला एकदा आठवतंय रात्री नऊच्या दरम्यान ते खूप प्रवास करून आमच्याकडे आले होते. दमलेले होते, पण तेवढ्यात आमच्याकडे आलेल्या एका स्नेह्याला त्यांनी अग्निहोत्र सांगितले. त्यानंतरचा त्यांचा चेहरा एवढ्या निरागस आनंदाने फुलला होता की मी माझ्या गुरूंच्या आज्ञेचे पालन केले आहे. इथे कुठेही त्यांचा 'चला उरकून टाकूया' हा भाव नव्हता. समोरच्या व्यक्तीचं पूर्ण समाधान होईपर्यंत ते त्याच्याशी बोलत होते. अशावेळी तहानभूक, थकवा कधीही त्यांना जाणवायचा नाही.

एक वर्ष कोळीसऱ्याचा उत्सव नानांकडे होता. आम्ही नेवऱ्यातून जाऊन येऊन ही कीर्तने करीत होतो.कीर्तन आटोपून रात्री घरी यायला रोजच दोन सव्वादोन व्हायचे. नाना तरीही नेहमीप्रमाणे साडेतीनला उठून त्यांचे स्नान, उपासना,नित्य आन्हीक आटोपायचे. अग्निहोत्रानंतर थोडंफार खाऊन साधारण आठ-साडेआठला ते तासभर विश्रांतीसाठी आडवे व्हायचे. त्यांचे एक वैशिष्ट्य होते, कधीही अंथरुणावर आडवे झाले की दोन मिनिटात ते घोरायला लागायचे. त्या दोन-चार दिवसात काय किंवा तसेही कायमचाच हा अनुभव होता की नानांना झोप लागली रे लागली की नेमका कोणाचातरी फोन यायचा व त्यांना फोन घेण्यासाठी उठायला लागायचे.तो फोन घेऊन मग झोपावे तर थोड्यावेळाने परत फोन यायचा व सतत त्यांची झोपमोड व्हायची. एक दिवस न राहून मी नानांना म्हटले नाना जेमतेम तासभर तुम्हाला विश्रांती मिळते,ती झोप तरी पूर्ण होऊ दे.आता झोपताना जरा मोबाईल स्विच ऑफ करूया. त्यावर नानांनी दिलेले उत्तर मी कायमच्यासाठी माझ्या हृदयावर कोरून ठेवले आहे. नाना म्हणाले,अरे कोणतेही तंत्रज्ञान स्वीकारले की त्याचे फायदे व तोटे हे दोन्हीही असणारच आहेत. मोबाईलचा संपर्कासाठी उपयोग आहे ना, मग त्याच्या या तोट्याकडे दुर्लक्ष करायचं,आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे श्रींची आज्ञा आहे, लोकसंग्रह हे आपले कार्य आहे याची जाणीव असू द्यावी. मग आता जर मी मोबाईल बंद ठेवला, तर लोकसंग्रह कसा होणार ? तो श्रींच्या आज्ञेचा अवमान होणार नाही का ? मी अवाक झालो होतो. गुरुआज्ञेच एवढं सूक्ष्मस्तरावर जाऊन पालन करणे हे माझ्यासाठी मार्गदर्शक होतं.अशा अनेक गोष्टीतून गुरुआज्ञेचे पालन नानांनी किती बारकाईने केले आहे ते आचरणीय आणि अनुकरणीय आहे.

मला आठवते आहे आमच्या गावाजवळच्या एका नवरात्र उत्सवात मंडळाची स्थिती नाही म्हणून नानांनी तो उत्सव कितीतरी कमी मानधन घेऊन केला होता. एकदा गोव्यात नानांचा एक उत्सव चालू होता. त्यादरम्यान पुढे आणखीन तीन नवीन कीर्तने आली होती.पण याच दरम्यान नानांचे नित्याचे नाभिक श्री. गणपा घोडके यांच्या मातोश्रींचे निधन झाले आहे हे वृत्त नानांना समजतात गोव्यातील पुढील नवीन मिळालेली तीन कीर्तने सोडून त्यांच्या सांत्वनासाठी स्व-रचित कवन करून नाना कवठ्याला त्यांचे घरी सांत्वनासाठी हजर झाले. तेव्हाही त्यांनी मागवून जाऊन त्यांचे सांत्वन करीन, आधी नवीन मिळालेली कीर्तने करतो असे म्हटले नाही. लोकसंग्रह हे आपले कार्य आहे या श्रींच्या आज्ञेची जाणीव नानांनी अखंड जपली होती. कोणत्याही प्रलोभनापेक्षा गुरुआज्ञेच्या काटेकोर पालनाकडे त्यांचे अखंड लक्ष असायचे. नानांच्या कीर्तन कारकिर्दीत साधारण बाराहजार कीर्तने झाली. म्हणजे बाराहजार गुणीले ** असा हिशोब मांडणाऱ्यांना नानांची नेमकी जमा काय आहे याचा कधीच यथार्थ अंदाज येणार नाही. श्रीकृपेची जी असीम दौलत त्यांना लाभली त्यापुढे या गुणाकारांना त्यांनी कायमच तुच्छ मानले. मला कायमच जाणवते, ज्यांच्या कीर्तनात प्रत्यक्ष परब्रम्ह सगुण रूपाने डोलले असे एक म्हणजे संत नामदेव, ज्यांच्या कीर्तनात श्रीविठ्ठल डोलले व दुसरे आमचे नाना ज्यांच्या कीर्तनात साक्षात कल्कीभगवान असे 'श्री' संतोषाने डोलले.

रंग देवता नानांच्या कीर्तनात कायमच प्रसन्न राहिली. याच कीर्तनकारीतेमुळे नानांच्या अनेक थोरामोठ्यांशी ओळखी झाल्या. पूज्य श्री नानामहाराज तराणेकर, पूज्य स्वामी स्वरूपानंद,पूज्य श्री मामामहाराज देशपांडे, पूज्य श्री पाटीलमहाराज अशा अनेक विभूतींचे आशीर्वाद नानांना लाभले.हे सारे नानांचे कीर्तन आवडीने ऐकत असत. नानांच्या कीर्तनाची वैशिष्ट्ये सांगायची म्हणजे त्यांची अद्वितीय अशी गायनकला, विषयाची स्पष्ट आणि नेमकी मांडणी.एक कीर्तन म्हटले तरी त्यातून कितीतरी कलांचा अविष्कार होत असतो. शब्दफेक, अभिनय, नर्मविनोद,समयसूचकता या गोष्टी नानांच्या कीर्तनात ठळकपणे दिसायच्या. नानांची करतालवादनाची कला आता दुर्मिळ आहे.आपल्या कीर्तन कारकीर्दीत नानांची एवढी कीर्तने झाली पण जो उत्साह,जी समरसता, जी श्रद्धा पहिल्या कीर्तनात होती ती शेवटच्या कीर्तनात देखील कायम होती.वयाचा त्यांच्या आवाजावर काहीही परिणाम झाला नाही उलट वाढत्या वयाबरोबर त्यांचा आवाज देखील दिव्यत्वाने उजळून जात होता. देवाचा आवाज कसा असावा असा मला कायम प्रश्न पडे, पण नानांना भेटल्यावर मला कळले की देवाचा आवाज हा नानांच्या आवाजापेक्षा भिन्न कसा असणार आहे ?

कीर्तनकारितेच्या या प्रवासात नानांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. अनेक पदव्या मिळाल्या. कीर्तनाचार्यवर्य, कीर्तनकलाशेखर, कीर्तनकलासागर अशा अनेक पदव्यांना नानांनी सन्मान दिला. नानांना महाडच्या वीरेश्वर देवस्थान कडून मिळालेली 'कीर्तनकलासागर' ही पदवी किती यथार्थ आहे. नानांच्या कीर्तनात सागराची अथांगता,सागराची धीरगंभीरता, सागराची खोली,तसेच समाजातील अनिष्ठावर प्रहार करण्यासाठी सागराची रौद्र भीषणता देखील होती. खरोखरीच नानांनी या पदवीला मोठा सन्मान दिला आहे.

कार्यक्रम

परमसद्गुरू श्री गजानन महाराज जन्मशताब्दी वर्ष (१७ मे २०१७-१८)
श्री महाराज जन्मकथा संकल्प भारत दौरा

बुवांच्या कीर्तनाचे अग्निहोत्र प्रचार आणि प्रसार हे मुख्य उद्दिष्ट होते. २०१७-१८ हे श्रींचे म्हणजेच परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष होते. हे निमित्त साधून किमान १०० ठिकाणी श्रींच्या जन्मकथेचे आख्यान सांगावे व कीर्तनाच्या माध्यमातून अग्निहोत्र सांगावे असा बुवांचा संकल्प होता . या कार्याची सुरुवात श्रींचे जन्मस्थान तसेच गंगा नदी किनारी खरगपूर, कलकत्ता येथे झाली व श्रींनी सुरुवातीचा कालखंड जेथे व्यतीत केला ती राजीम, रायपुर तसेच अमरकंटक हि क्षेत्रे, बिलासपुर, नागपूर, कवठे गुलंद ते अक्कलकोट या बुवांच्या पायी वारीतील अनेक ठिकाणी व भारतभर सर्व प्रमुख पवित्र स्थानांवर बुवांनी संकल्प कीर्तने केली.

संकल्प दौरा कीर्तने

  • क्र. ११४- श्री. महालक्ष्मी मंदीर, कल्याण
  • क्र. ११३- ज्येष्ठ नागरिक संघ, डोंबिवली
  • क्र. ११२- औरंगाबाद
  • क्र. १११- कोंडे, राजापूर
  • क्र. ११०- श्री. आपटे, गोवा
  • क्र. १०९- कराड
  • क्र. १०८- गजानन महाराज मंदिर, उज्जैन
  • क्र. १०७- श्री. रामनवमी उत्सव, आपटा
  • क्र. १०६- श्री. कुलकर्णी, पनवेल
  • क्र. १०५- गणपती मंदिर, डोंबिवली
  • क्र. १०४- हनुमान मंदीर, बदलापूर
  • क्र. १०३- वांगणी, बदलापूर
  • क्र. १०२- बदलापूर, श्री कुवळेकर
  • क्र. १०१- सोलगाव, राजापूर, रत्नागिरी
  • क्र. १००- विश्व अग्निहोत्र दिन समारोह, रत्नागिरी
  • क्र. ९९- श्री. घरत, गणेशपुरी
  • क्र. ९८- श्री. पटवर्धन, कल्याण
  • क्र. ९७- श्री. कौपिनेश्वर देवस्थान, ठाणे
  • क्र. ९६- श्री. गजानन महाराज मंदिर, डहाणू
  • क्र. ९५- वाकवली
  • क्र. ९४- शिवथरघळ
  • क्र. ९३- श्रीवर्धन
  • क्र. ९२- श्री. हरवंदे, महाड
  • क्र. ९१- तळा
  • क्र. ९०- गाणगापूर
  • क्र. ८९- सोनामाता विद्यालय, सोलापूर
  • क्र. ८८- हनुमान मंदिर, श्री. केळकर, नागपूर
  • क्र. ८७- रथसप्तमी उत्सव, श्री. कठाळे, नागपूर
  • क्र. ८६- श्री. काळकर, मुलुंड, मुंबई
  • क्र. ८५- मोरजी, गोवा
  • क्र. ८४- ब्रह्मदेव देवस्थान, ब्रह्माकरमळी, सत्तरी, गोवा
  • क्र. ८३- साखळी, गोवा
  • क्र. ८२- श्री योगेश्वरी देवी संस्थान, म्हापसा, गोवा
  • क्र. ८१- अग्नीहोत्र मंदिर, श्री. आपटे, म्हापसा, गोवा
  • क्र. ८०- शृंगेरी
  • क्र. ७९- दत्तमंदिर, ठाणे
  • क्र. ७८- बालाजी मंदिर, कल्याण
  • क्र. ७७- दत्तजयंती उत्सव, कवठेगुलंद
  • क्र. ७६- उपासनी बाबा आश्रम, साकोरी
  • क्र. ७५- श्री. साईबाबा देवस्थान, शिर्डी
  • क्र. ७४- श्री. मोरया गोसावी देवस्थान उत्सव, चिंचवड
  • क्र. ७३- गणेशवाडी
  • क्र. ७२- श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव, पुणे
  • क्र. ७१- कुरुक्षेत्र
  • क्र. ७०- मथुरा
  • क्र. ६९- महाराष्ट्र भवन दिल्ली
  • क्र. ६८- हृषिकेश (संगम)
  • क्र. ६७- हरिद्वार
  • क्र. ६६- गया
  • क्र. ६५- बुद्धगया
  • क्र. ६४- प्रयाग (त्रिवेणी संगम)
  • क्र. ६३- काशी
  • क्र. ६२- अयोध्या
  • क्र. ६१- सोनामाता मंदिर, सिद्धपुर (मातृगया), गुजरात
  • क्र. ६०- साईमंदिर, भद्रा, अहमदाबाद
  • क्र. ५९- दत्तमंदिर, चांदखेडा, अहमदाबाद
  • क्र. ५८- श्री गिरनार पर्वत पायथा, जुनागड
  • क्र. ५७- प्रभास तीर्थ क्षेत्र, गुजरात
  • क्र. ५६- सोमनाथ मंदीर, गुजरात
  • क्र. ५५- द्वारका, गुजरात
  • क्र. ५४- बेट द्वारका, गुजरात
  • क्र. ५३- नारेश्वर, गुजरात
  • क्र. ५२- गरुडेश्वर, गुजरात
  • क्र. ५१- दहेज, गुजरात
  • क्र. ५०- बडोदा
  • क्र. ४९- श्री परशुराम मंदिर, संगम माहुली, सातारा
  • क्र. ४८- लईराई देवीसंस्थान, शिरगाव, गोवा
  • क्र. ४७- दत्तमंदिर, भोर, महाराष्ट्र
  • क्र. ४६- ब्रह्मानंद स्वामी मठ, कागवाड, महाराष्ट्र
  • क्र. ४५- कवठेगुलंद, कन्यागत महापर्वकाळ समाप्ती उत्सव
  • क्र. ४४- विठ्ठल मंदिर, गणेशवाडी
  • क्र. ४३- चिकुरडे, सांगली
  • क्र. ४२- रावेर, जामखंडी, बेळगाव
  • क्र. ४१- ढोल्या गणपती मंदिर, वाई
  • क्र. ४० कागवाड
  • क्र. ३९ मिरज किल्ला भाग
  • क्र. ३८ दड्डी
  • क्र. ३७ वरणगे पाडळी
  • क्र. ३६ पट्टणकोडोली
  • क्र. ३५ चिपळूण
  • क्र. ३४ श्री क्षेत्र परशुराम
  • क्र. ३३ गणपतीपुळे
  • क्र. ३२ संगमेश्वर
  • क्र. ३१ देवरुख
  • क्र. ३० साखरपा
  • क्र. २९ रत्नागिरी
  • क्र. २८ श्री परशुराम मंदिर, बाणगंगा, वाळकेश्वर, मुंबई
  • क्र. २७ सौरभ कार्यालय बावधन पुणे
  • क्र. २६ श्री राममहाराज भक्तमंडळी, रंकाळा संध्यामठ कोल्हापूर
  • क्र. २५ गुरुमंदिर, अक्कलकोट
  • क्र. २४ सोलापूर
  • क्र. २३ वाघोली
  • क्र. २२ मंगळवेढा
  • क्र. २१ पंढरपूर
  • क्र. २० खर्डी
  • क्र. १९ सांगोला
  • क्र. १८ कुची
  • क्र. १७ मिरज
  • क्र. १६ सांगली
  • क्र. १५ बालाजी मंदिर नागपूर
  • क्र. १४ गजानन महाराज मंदिर, महाल, नागपूर
  • क्र. १३ नागपूर
  • क्र. १२ मुर्तीजापूर (बाळप्पा मठ)
  • क्र. ११ कारंजा (दत्त जन्मस्थान)
  • क्र. १० अमरावती
  • क्र. ९ काटोल (चंडिका मंदिर)
  • क्र. ८ नागपूर (मानेगाव दत्तमंदिर)
  • क्र. ७ अमरकंटक
  • क्र. ६ रायपूर
  • क्र. ५ राजीम (राजीव लोचन मंदिर)
  • क्र. ४ बिलासपूर गजानन महाराज मंदिर
  • क्र. ३ बेल्लूर मठ कलकत्ता
  • क्र. २ दक्षिणेश्वर मठ कलकत्ता
  • क्र. १ खरगपूर (श्रींचे जन्मस्थान)