narayanbuwa kane


गीत नानाई

पृष्ठ 12

काळ पुढे सरकत होता. नाना आता अठ्ठ्यात्तर वर्षाचे झाले होते. यावेळी सहज एका ओळखीच्या डॉक्टरांच्या आग्रहास्तव केलेल्या वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्यांमधून नानांना हृदयाजवळील रक्तवाहिन्यांमध्ये पाच ब्लॉकेजीस असल्याचे निदान झाले. सगळा परिवार घाबरून गेला होता. नाना सर्वांना सांगत होते की मला काहीही त्रास होत नाहीये, पण त्यांच्या वयाचा विचार करता सर्वचजण त्यांना विश्रांतीचा सल्ला देत होते.पण ज्या देहाला विश्रांती हा शब्दच माहित नव्हता त्याला ही सक्तीची विश्रांती कशी मानवणार ! नाना या काळात कायमच ठामपणे सांगायचे, मी माझ्या मनातच रोगाला येऊ देत नाही, त्यामुळे तो माझ्या शरीरात प्रवेश करणार नाही, आणि आता तर श्रीसेवेशिवाय मला काहीही करायचं नाहीये.कीर्तन करताना जर मला मृत्यू आला तर ते मी माझे भाग्य समजेन. सर्वांच्या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन नाना चार-पाच महिने घरी राहिले होते, पण श्रींच्या कार्यापासून वेगळे राहण्याने त्यांची खूपच मानसिक ओढाताण आणि घुसमट होत होती.ही मानसिक ओढाताण त्यांच्या त्या वेळेच्या एका गीतातून प्रगट झाली.

रक्तमांस, कफपित्त वातयुत
हाडकांचा सापळा,
तुमची कला, तुम्ही निर्मिला,
देवा, तुम्हीच तो सांभाळा ||धृ ||
एक आहे एक नाही
छातीत येती कळा
तरीही तुमची कीर्ती गाया
उत्सुक आहे गळा ||१||
वसा घेतला मागतसे मी
पसरूनी पसा भला
वसा घेतला पूर्ण कराया,
शक्ती द्या बाळा ||२||
आपत्तींचे डोंगर उठती
सांभाळा गोकुळा,
असे न घडो कधीही देवा,
नारायणा हरला ||३||

नानांची ही होणारी घुसमट, तगमग माईंनी ओळखली. मनावर दगड ठेवून त्यांनी नानांना पथ्यपाणी सांभाळायच्या अटीवर बाहेर पडायला परवानगी दिली,आणि नाना श्रीकार्याला नव्या जोमाने बाहेर पडले.

सन दोनहजार सतरा-अठरा. परमसद्गुरु श्रीगजानन महाराज यांचे जन्मशताब्दी वर्ष. सर्वत्र हे वर्ष उत्साहाने साजरे होणार होते. नानांनी या शताब्दी वर्षासाठी एक आगळावेगळा संकल्प केला. श्रींची जन्मकथा आणि श्रींच्या जन्माच्या प्रसंगावरचे 'गीत गजानन' या श्रींच्या गीतात्मक चरित्रातील नानांनी रचलेले,' मध्यरात्री हा सूर्य उगवला, तिमिर दूर जाहला', हे गीत कीर्तनाच्या माध्यमातून किमान शंभर ठिकाणी सादर करायचे. पूर्ण भारतभर फिरून नाना हे श्रींच्या जन्माचे आख्यान सादर करणार होते. अक्कलकोटला जाऊन या उपक्रमासाठी श्री दादामहाराजांचे अनुमोदन व आशीर्वाद नानांनी घेतले. या कीर्तनांचे एक मोठे वैशिष्ट्य हे की या मागचा नानांचा मुख्य उद्देश सर्व दिशांमध्ये श्रींची जन्मकथा प्रक्षेपित करणे, तसेच सर्व दिशांमध्ये अग्निहोत्राचा संदेश प्रक्षेपित करणे हे होते. या कीर्तन दौऱ्यासाठीचे नियोजन सुरू झाले. याचे आणखीही एक आगळेवेगळे वैशिष्ट्य हे होते की या शताब्दीवर्षातील ही कीर्तने दिशांना संदेश देण्यासाठीची होती, महाराष्ट्र वगळता इतर ठिकाणी बरीचशी कीर्तने ही श्रोत्यांविनासुद्धा सादर केली गेली.यातील खूप कीर्तनांना उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले.

पहिले कीर्तन श्रीजींचे जन्मस्थान पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे झाले. नंतर कलकत्त्याला गंगाकाठी कीर्तन झाले. संतोषकाका पेंडसे यावेळी नानांबरोबर होते. बाकीच्या राज्यांमधील कीर्तनांना भाषेच्या अडचणीमुळे श्रोते नसायचे. बरीचशी कीर्तने ही तेथील स्थान महात्म्यामुळे त्या त्या ठिकाणी करण्यात आली होती. बंगाल,ओरिसा,आंध्रनंतर श्रीजींच्या घराण्याचे मूळ स्थान राजीम येथील राजीवलोचनाच्या मंदिरात नानांचे कीर्तन झाले. यावेळी माझा गुरुबंधू रुपेश भूरंगी व त्याचे वडील तबला पेटीला साथीदार होते. या कीर्तनावेळचा एक अद्भुत अनुभव आहे.या मंदिरात रायपुर येथुन रुपेशच्या गाडीने नाना दुपारी पोहोचले. दुपारी मंदिर बंद व्हायची वेळ झाली होती. तुम्ही सभामंडपात सेवा सादर करा असे सांगून पुजारी निघून गेला. तबलजी पेटीवाला व नाना अशा तिघात कीर्तन चालू झाले. थोड्याच वेळात एक पांढरा झब्बा लेंगा घातलेला एक मनुष्य तेथे आला. पूर्ण किर्तन त्यांनी ऐकले. कीर्तन आटोपल्यावर बरोबर आणलेला भोजनाचा डबा रुपेश घेऊन आला. नानांनी त्या माणसाला आमच्याबरोबर जेवणार का विचारले. त्यांनीही हो, हा प्रसाद आहे, मी घेईन असे म्हटले. भोजनानंतर सहजच नानांनी ते निघाले आहेत हे बघून त्यांना विचारले, आपण कोठे राहता ? त्यावर गाभाऱ्याच्या दिशेला बोट करून त्यांनी उत्तर दिले, यही | पायऱ्या उतरून ते जात होते तेवढ्यात नानांनी त्यांना विचारले, आपका शुभनाम ? त्यावर,'कृष्ण' एवढाच शब्द उच्चारून ती व्यक्ती पुढच्या दहा-पंधरा पावलात गुप्त झाली. वेळोवेळी अशा गोष्टी जेव्हा अनुभवाला येतात तेव्हा त्याला योगायोग तरी किती वेळा म्हणणार. रायपूर,बिलासपूर, अमरकंटक, उज्जैन अशी कीर्तने करून नाना नागपूरला आले. नागपूर, अमरावती, कारंजा येथे त्यांची कीर्तने झाली. त्यानंतर थोड्या दिवसांनी नाना, मी व गोविलकरकाका गुजरात दौऱ्यावर गेलो. श्रींच्या अस्थिविसर्जन झालेल्या ठिकाणी नर्मदा मैयाच्या वाळवंटात नानांचे कीर्तन झाले.बाजूला शांत वाहती नर्मदामैया आणि वाळवंटात नामदेवांप्रमाणे कीर्तन करणारे नाना, समोर श्रोते म्हणून गोविलकरकाका, मी आणि बडोद्यातील आठले पती-पत्नी. एक वेगळाच कीर्तन सोहळा मी अनुभवला होता. त्या एका दिवशी भालोद, गरुडेश्वर,नारेश्वर अशी कीर्तने झाली. नंतर सोमनाथ, द्वारका येथील कीर्तने आटोपून नाना व गोविलकरकाका वाराणसीला गेले. वाराणसी,अयोध्या येथे कीर्तने करून बौद्धगया येथे नानांनी कीर्तन केले व पहाटे ते दिल्लीला पोहोचले. योग्य जागा बघून तेथे कीर्तन केले. त्यादिवशी पहिल्यांदाच नानांनी हॉटेलमधील खाणे घेतले. दुपारी हरियाणातील रोहतक येथे आमची परिचित चि. माधुरी पाठक हिच्याकडे कीर्तन केले. तिनेच व्यवस्था लावून दिल्यामुळे पानिपतला कीर्तन झाल्यावर,चौवीस दिवसांचा हा प्रदीर्घ दौरा आटोपून नाना घरी परतले. या शताब्दीवर्षाच्या संकल्पात एकशेअठरा कीर्तने झाली. महाबलीपुरम, कांची कामकोटी येथील कीर्तनांचे देखील नियोजन झाले होते, पण नानांना नेमके सुतक आल्यामुळे तो कार्यक्रम रद्द करावा लागला. आज मागे वळून बघताना जाणवते कि, हृदयातील पाच ब्लॉकेजीस घेऊन हा विलक्षण संकल्प आणि प्रवास नानांनी केला होता. या सर्व प्रवासात श्रींवरची निष्ठा व केलेला अपार लोकसंग्रह नानांच्या कामी आला होता.

नानांची कीर्तनकारिता हीच त्यांच्यासाठी श्रीप्रतिपादित पंचसाधन मार्गाची साधना झाली. यज्ञदानतप: कर्मस्वाध्याय निरतो भवेत | एष एव ही श्रृत्युक्त: सत्यधर्म:सनातन: | यज्ञ,दान,तप, कर्म आणि स्वाध्यायाचे निरंतर आचरण हा श्रीप्रतिपादित पंचसाधनमार्ग. नाना कायमच या पंचसाधनमार्गाचे निष्ठावंत पाईक राहिले.

कीर्तनातून नानांनी श्रींच्या आज्ञेने अखंडपणे यज्ञसंस्थेचा म्हणजेच अग्निहोत्राचा प्रचार केला. कीर्तनाची वेळ सुद्धा ते शक्यतो अशी निवडायचे की कीर्तनातून प्रात्यक्षिकासह अग्निहोत्राचा प्रचार करता यावा. अग्निहोत्राचे आचरण नानांनी अतिशय नेमस्तपणे केले. कीर्तनकारिता म्हणजे प्रवास हा ओघाने आला.बराचसा प्रवास नानांनी एसटीतूनच केला. सुरुवातीच्या काळात तर अग्निहोत्राची वेळ झाली की त्या आधीच्या थांब्यावर नाना एसटीतुन उतरायचे व तेथे अग्निहोत्र करून घ्यायचे. अग्निहोत्र झाल्यावर मिळेल त्या गाडीने ते पुढचा टप्पा गाठायचे, इतक्या कठोरपणे त्यांनी प्रवासातसुद्धा अग्निहोत्राचे आपले आचरण ठेवले होते. नानांची एवढी प्रखर निष्ठा बघून पुढे एकदा श्रींनीच त्यांना एसटीच्या प्रवासात असताना असे मध्ये उतरून अग्निहोत्र नाही केले तरी चालेल अशी सूट दिली. पण होता होईतो नानांनी कधीही प्रवासात देखील अग्निहोत्र चुकविले नाही. रेल्वेच्या प्रवासात जिथे अग्निहोत्र करणे शक्य नाहीये तिथे ते मनाने आहुती द्यायचे पण अग्निहोत्राचे स्मरण ठेवले नाही असे कधीही झाले नाही.इतक्या या निष्ठेच्या आचरणाने नानांचा यज्ञ मार्ग सिद्ध झाला.

दानामध्ये ज्या दानाने समाजातील सात्विकता वाढेल असे दान हे श्रेष्ठ मानले जाते.नानांच्या कीर्तनातून होणाऱ्या ज्ञानदानाने समाज सात्विकतेकडे झुकून अग्निहोत्री होऊ लागला. त्यामुळे नानांचा दान मार्ग सुद्धा सिद्ध झाला.

नाना तर प्रत्यक्ष तपमूर्ती आहेत. पेशा कीर्तनकाराचा, त्यामुळे प्रवास, जागरण हे नित्याचेच. पण झोपायला कितीही उशीर झाला तरी त्यांचे ब्राह्ममुहूर्तावरील उठणे, थंड पाण्याने स्नान, गायत्री,संध्या,अग्निहोत्र यांचे आचरण कधीच चुकायचे नाही. प्रवासातही अग्निहोत्र सांभाळण्याकडे त्यांचा कटाक्ष असे. 'स्वतः केले मग सांगितले', या त्यांच्या आचरणामुळे आपोआप त्यांच्या शब्दाला वजन आले. जे अग्निहोत्र सांगण्यासाठी आमच्यासारख्यांना शेकडो शब्द खर्ची घालावे लागतात व तरी त्या शब्दांचा समोरच्या माणसावर परिणाम होत नाही, तेथे नानांच्या तपोचरणामुळे त्यांच्या मोजक्या शब्दांनी माणसे कार्यप्रेरित होऊन अग्नीहोत्र करून लागतात. कीर्तन हे आपले जीवनकार्य आहे या श्रींच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर केलेला प्रवास हा सुद्धा त्यांच्या तपोचरणाचाच भाग आहे. सात-आठ वर्षांपूर्वींचा नानांचा पंधरा दिवसातला प्रवास आठवतो. नाना ओरिसातील भुवनेश्वर येथून गोव्याला आले. तेथील कार्यक्रम आटोपून एक दिवस घरी गेले. दुसऱ्या दिवशी तेथून गाणगापूर येथे सात दिवस सेवा केली.गाणगापूरवरून रत्नागिरी, नेवरे येथे तीन दिवस 'गीत समर्थांयन' हा कार्यक्रम व तेथून थेट महाड, असा पंधरा दिवसातील त्यांचा प्रवास नुसता बघून सुद्धा दमायला होते. पण गुरुआज्ञेचे पालन करण्यासाठीचे हे तपच नानांची शक्ती आहे.

नानांचे प्रत्येक कर्म हे 'इदं न मम' या भावानेच केले जाते. कोणत्याही गोष्टीचे कर्तेपण स्वतःकडे न घेण्याचा नानांचा कटाक्ष असे, नव्हे ती त्यांची सहजप्रवृत्ती होती. आपली कीर्तनकला, गायनकला,काव्यसंपदा यांचे कर्तेपण श्रींकडे सहजपणे सोपवून नाना मोकळे होत. हे मजपासोनी झाले | परी म्या नाही घडविले | हि ज्ञानेश्वरीतील ओवी नानांना तंतोतंत लागू होते व त्यांने त्याचा कर्म मार्ग सिध्द होतो.

श्री प्रतिपादित पंचसाधन मार्गातील शेवटचा मार्ग स्वाध्याय, अर्थात मोक्षहेतू स्वाध्याय. नानांचा स्वाध्याय हा त्यांच्या गीतांमधून प्रकट झाला आहे. आणि हा स्वाध्याय फक्त स्वतःपुरताच नाही तर, जो जो या पंचसाधन मार्गाचा पथिक आहे, त्या प्रत्येकाला हा स्वाध्याय त्या मोक्षसोपानाकडे जाण्यासाठी निश्चितच मदत करतो. खरे तर नानांची काव्यसंपदा हा विषयच एवढा मोठा आहे की त्याचे रसग्रहण व सारग्रहण करण्यासाठी कितीही लिहीले तरी कमी पडावे.आपण त्या काव्यसंपदेचा धावता आढावा घेऊ.

नानांच्या काव्याकडे पाहताना जाणवते ती त्या काव्याच्या वेळेची नानांची उन्मनी अवस्था. मनाच्या उन्मनी अवस्थेतच अशी काव्यरचना घडू शकते. जेथे 'मी' काव्य करतोय ही भावना सुद्धा नाही, त्या काव्व्याच्या प्रेरणेसाठी प्रयास नाहीत, आहे ती निव्वळ सहजावस्था. जसे हे ईश्वरी देणे प्राप्त झाले ते तसेच्या तसे तुम्हा पुढे मांडले, यात माझे काहीही नाही ही अलिप्त अवस्था सुद्धा. असे म्हणतात की, प्रत्येक कवी हा संत असतो असे नाही, पण प्रत्येक संत हा कवी असतो, या उक्तीची सत्यता नानांच्या काव्व्यातून पटते. इतर ठिकाणी गीतकार वेगळा, संगीतकार वेगळा, गायक वेगळा, पण नानांच्या बाबतीत ईश्वरकृपेने प्राप्त झालेले काव्य, त्याला त्याच्याच कृपेने लागलेली चाल, आणि त्या कृपेची साक्ष देणारे गायन, हे सारेच त्या गाण्याला त्रिगुणातीत अवस्था प्राप्त करून देते.

नानांच्या काव्व्यातले आणखीन एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अतिशय गुह्य आशय नेमक्या, थोडक्या शब्दात व्यक्त करणे.कृष्णमय झालेल्या गोपींच्या अवस्थेचे वर्णन करताना नाना म्हणतात, करीत मी होते बाई वेणी फणी | पहात होते म्हणून मी दर्पणी | आता सांगू कसं लपवून ठेवू कसं | दर्पणी कान्हा दिसला || वेणी फणी करण्यासाठी आरशात बघताना त्या आरशात स्वतःच्या प्रतिबिंबाठिकाणी भगवान कृष्ण दिसणे ही केवढी उच्च अवस्था किती कमी शब्दात व्यक्त होते. दुसऱ्या एका गवळणीत कृष्णाची परब्रम्ह ही ओळख जाणणारी गोपी म्हणते,परब्रम्ह परि बाळ आमुचा || सर्व बंधने झुगारून टाकणारी ही भक्ती म्हणते, परब्रम्ह असला म्हणून काय,आम्हाला तो आमचा बाळच आहे,ही भावना या एका ओळीतून व्यक्त होते.

नानांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे कमी शब्दात व्यक्त झालेल्या विचारामागचा विचार व्यक्त करण्याची त्यांची खुबी.' चिंता करितो विश्वाची' या समर्थांच्या वाक्यावर नानांमधला कवी जागा झाला व या समर्थवाक्यावर आठ कडव्यांचे एक सुंदर काव्य निर्माण झाले. स्वतःमध्ये अवघ्या विश्वाला व विश्वामध्ये स्वतःला पाहणारे नाना म्हणतात, अवघे विश्वचि माझे घर | आपपरता गेली दूर || या मायीक विश्वाचे वर्णन करताना ते म्हणतात, कुणीही नाही जगी या माझे | मीही नाही कुणाचा | खेळ म्हणा बाजार म्हणा हा | मेळा दोन क्षणांचा || हे विश्व मायीक आहे म्हणून काय कर्तव्य सोडायचे का, म्हणून नाना म्हणतात,असार संसार जरी मानीयेला, तरी काय त्याला सोडायचे || नानांच्या काव्व्यातल्या काही काही कल्पना तर एवढ्या हृद्य आहेत की त्या कशा स्फुरल्या याचे आश्चर्य वाटते.' नम्र होऊनी श्रीगुरुचरणा बसलो मी खेटुनी' या ओळीतला व्यक्त झालेला भाव पहा. प्रेमाचा अधिकार तरीही तो गाजवताना पाळलेली मर्यादा किती नेमकेपणाने येथे खेटुनी शब्दातून व्यक्त होते. दुसऱ्या एका काव्व्यात नाना म्हणतात,'प्रसन्न गुरुची कृपासुंदरी वरली नारायणी', गुरूंच्या कृपेला कृपासुंदरी म्हणून वरणे, ही भावनाच किती वेगळी आहे.

नानांच्या संगीतकार म्हणूनच्या प्रतिभेला सुद्धा सलाम करावासा वाटतो.वेगवेगळ्या गीतांना त्यांनी दिलेल्या चाली अक्षरशः स्तिमित करतात.वेगवेगळ्या रागांचे मिश्रण करून किंवा त्यांचे सांधे जोडून केलेल्या चाली त्यांचे संगीतकार म्हणून असामान्यत्व स्पष्ट करतात. एकाच गीतात वेगवेगळ्या प्रहरांचे आलेले वर्णन वेगवेगळ्या रागांमध्ये व्यक्त करणारी त्यांची प्रतिभा खरोखरीच दिव्यत्वाचे दर्शन घडविते. गीतकार,संगीतकार व गायक या वेगवेगळ्या भूमिकेंमधील त्यांचे श्रेष्ठत्व त्यांच्यावरील श्रीकृपाच अधोरेखित करते.

कार्यक्रम

परमसद्गुरू श्री गजानन महाराज जन्मशताब्दी वर्ष (१७ मे २०१७-१८)
श्री महाराज जन्मकथा संकल्प भारत दौरा

बुवांच्या कीर्तनाचे अग्निहोत्र प्रचार आणि प्रसार हे मुख्य उद्दिष्ट होते. २०१७-१८ हे श्रींचे म्हणजेच परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष होते. हे निमित्त साधून किमान १०० ठिकाणी श्रींच्या जन्मकथेचे आख्यान सांगावे व कीर्तनाच्या माध्यमातून अग्निहोत्र सांगावे असा बुवांचा संकल्प होता . या कार्याची सुरुवात श्रींचे जन्मस्थान तसेच गंगा नदी किनारी खरगपूर, कलकत्ता येथे झाली व श्रींनी सुरुवातीचा कालखंड जेथे व्यतीत केला ती राजीम, रायपुर तसेच अमरकंटक हि क्षेत्रे, बिलासपुर, नागपूर, कवठे गुलंद ते अक्कलकोट या बुवांच्या पायी वारीतील अनेक ठिकाणी व भारतभर सर्व प्रमुख पवित्र स्थानांवर बुवांनी संकल्प कीर्तने केली.

संकल्प दौरा कीर्तने

  • क्र. ११४- श्री. महालक्ष्मी मंदीर, कल्याण
  • क्र. ११३- ज्येष्ठ नागरिक संघ, डोंबिवली
  • क्र. ११२- औरंगाबाद
  • क्र. १११- कोंडे, राजापूर
  • क्र. ११०- श्री. आपटे, गोवा
  • क्र. १०९- कराड
  • क्र. १०८- गजानन महाराज मंदिर, उज्जैन
  • क्र. १०७- श्री. रामनवमी उत्सव, आपटा
  • क्र. १०६- श्री. कुलकर्णी, पनवेल
  • क्र. १०५- गणपती मंदिर, डोंबिवली
  • क्र. १०४- हनुमान मंदीर, बदलापूर
  • क्र. १०३- वांगणी, बदलापूर
  • क्र. १०२- बदलापूर, श्री कुवळेकर
  • क्र. १०१- सोलगाव, राजापूर, रत्नागिरी
  • क्र. १००- विश्व अग्निहोत्र दिन समारोह, रत्नागिरी
  • क्र. ९९- श्री. घरत, गणेशपुरी
  • क्र. ९८- श्री. पटवर्धन, कल्याण
  • क्र. ९७- श्री. कौपिनेश्वर देवस्थान, ठाणे
  • क्र. ९६- श्री. गजानन महाराज मंदिर, डहाणू
  • क्र. ९५- वाकवली
  • क्र. ९४- शिवथरघळ
  • क्र. ९३- श्रीवर्धन
  • क्र. ९२- श्री. हरवंदे, महाड
  • क्र. ९१- तळा
  • क्र. ९०- गाणगापूर
  • क्र. ८९- सोनामाता विद्यालय, सोलापूर
  • क्र. ८८- हनुमान मंदिर, श्री. केळकर, नागपूर
  • क्र. ८७- रथसप्तमी उत्सव, श्री. कठाळे, नागपूर
  • क्र. ८६- श्री. काळकर, मुलुंड, मुंबई
  • क्र. ८५- मोरजी, गोवा
  • क्र. ८४- ब्रह्मदेव देवस्थान, ब्रह्माकरमळी, सत्तरी, गोवा
  • क्र. ८३- साखळी, गोवा
  • क्र. ८२- श्री योगेश्वरी देवी संस्थान, म्हापसा, गोवा
  • क्र. ८१- अग्नीहोत्र मंदिर, श्री. आपटे, म्हापसा, गोवा
  • क्र. ८०- शृंगेरी
  • क्र. ७९- दत्तमंदिर, ठाणे
  • क्र. ७८- बालाजी मंदिर, कल्याण
  • क्र. ७७- दत्तजयंती उत्सव, कवठेगुलंद
  • क्र. ७६- उपासनी बाबा आश्रम, साकोरी
  • क्र. ७५- श्री. साईबाबा देवस्थान, शिर्डी
  • क्र. ७४- श्री. मोरया गोसावी देवस्थान उत्सव, चिंचवड
  • क्र. ७३- गणेशवाडी
  • क्र. ७२- श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव, पुणे
  • क्र. ७१- कुरुक्षेत्र
  • क्र. ७०- मथुरा
  • क्र. ६९- महाराष्ट्र भवन दिल्ली
  • क्र. ६८- हृषिकेश (संगम)
  • क्र. ६७- हरिद्वार
  • क्र. ६६- गया
  • क्र. ६५- बुद्धगया
  • क्र. ६४- प्रयाग (त्रिवेणी संगम)
  • क्र. ६३- काशी
  • क्र. ६२- अयोध्या
  • क्र. ६१- सोनामाता मंदिर, सिद्धपुर (मातृगया), गुजरात
  • क्र. ६०- साईमंदिर, भद्रा, अहमदाबाद
  • क्र. ५९- दत्तमंदिर, चांदखेडा, अहमदाबाद
  • क्र. ५८- श्री गिरनार पर्वत पायथा, जुनागड
  • क्र. ५७- प्रभास तीर्थ क्षेत्र, गुजरात
  • क्र. ५६- सोमनाथ मंदीर, गुजरात
  • क्र. ५५- द्वारका, गुजरात
  • क्र. ५४- बेट द्वारका, गुजरात
  • क्र. ५३- नारेश्वर, गुजरात
  • क्र. ५२- गरुडेश्वर, गुजरात
  • क्र. ५१- दहेज, गुजरात
  • क्र. ५०- बडोदा
  • क्र. ४९- श्री परशुराम मंदिर, संगम माहुली, सातारा
  • क्र. ४८- लईराई देवीसंस्थान, शिरगाव, गोवा
  • क्र. ४७- दत्तमंदिर, भोर, महाराष्ट्र
  • क्र. ४६- ब्रह्मानंद स्वामी मठ, कागवाड, महाराष्ट्र
  • क्र. ४५- कवठेगुलंद, कन्यागत महापर्वकाळ समाप्ती उत्सव
  • क्र. ४४- विठ्ठल मंदिर, गणेशवाडी
  • क्र. ४३- चिकुरडे, सांगली
  • क्र. ४२- रावेर, जामखंडी, बेळगाव
  • क्र. ४१- ढोल्या गणपती मंदिर, वाई
  • क्र. ४० कागवाड
  • क्र. ३९ मिरज किल्ला भाग
  • क्र. ३८ दड्डी
  • क्र. ३७ वरणगे पाडळी
  • क्र. ३६ पट्टणकोडोली
  • क्र. ३५ चिपळूण
  • क्र. ३४ श्री क्षेत्र परशुराम
  • क्र. ३३ गणपतीपुळे
  • क्र. ३२ संगमेश्वर
  • क्र. ३१ देवरुख
  • क्र. ३० साखरपा
  • क्र. २९ रत्नागिरी
  • क्र. २८ श्री परशुराम मंदिर, बाणगंगा, वाळकेश्वर, मुंबई
  • क्र. २७ सौरभ कार्यालय बावधन पुणे
  • क्र. २६ श्री राममहाराज भक्तमंडळी, रंकाळा संध्यामठ कोल्हापूर
  • क्र. २५ गुरुमंदिर, अक्कलकोट
  • क्र. २४ सोलापूर
  • क्र. २३ वाघोली
  • क्र. २२ मंगळवेढा
  • क्र. २१ पंढरपूर
  • क्र. २० खर्डी
  • क्र. १९ सांगोला
  • क्र. १८ कुची
  • क्र. १७ मिरज
  • क्र. १६ सांगली
  • क्र. १५ बालाजी मंदिर नागपूर
  • क्र. १४ गजानन महाराज मंदिर, महाल, नागपूर
  • क्र. १३ नागपूर
  • क्र. १२ मुर्तीजापूर (बाळप्पा मठ)
  • क्र. ११ कारंजा (दत्त जन्मस्थान)
  • क्र. १० अमरावती
  • क्र. ९ काटोल (चंडिका मंदिर)
  • क्र. ८ नागपूर (मानेगाव दत्तमंदिर)
  • क्र. ७ अमरकंटक
  • क्र. ६ रायपूर
  • क्र. ५ राजीम (राजीव लोचन मंदिर)
  • क्र. ४ बिलासपूर गजानन महाराज मंदिर
  • क्र. ३ बेल्लूर मठ कलकत्ता
  • क्र. २ दक्षिणेश्वर मठ कलकत्ता
  • क्र. १ खरगपूर (श्रींचे जन्मस्थान)